एकनाथ पाटीलकोल्हापूर : खून, खुनी हल्ला, अपहरण, मारहाण, मटका-जुगाराचे १२ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ‘एस. टी. सरकार’ गँगचा म्होरक्या इचलकरंजी नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सभापती संजय शंकर तेलनाडे यांच्यासह १८ जणांना ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. तो सापडत नाही, असे कारण इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगितले जात आहे. चारवेळा संधी देऊनही तपासात प्रगती नसल्याने निष्क्रिय पथक असा ठपका ठेवत त्यांना कोल्हापूरच्या एलसीबीच्या अंतर्गत काम करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या आहेत. या कारवाईचा धसका पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
इचलकरंजी परिसरात ‘एस. टी. सरकार’ गँगच्या नावाखाली नगरसेवक संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे यांच्या नेतृत्वाखाली त्याचे साथीदार विविध गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. या गँगवर खून, खुनी हल्ला, फसवणूक, बनावटीकरण, दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, मटका, जुगार, जमावबंदी आदेश भंग करणे, आदी गुन्हे दाखल आहेत. तेलनाडे बंधू संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून महत्त्वाच्या ठिकाणच्या मिळकती गिळंकृत करण्यासाठी समांतर यंत्रणा चालवीत असल्याचे निदर्शनास आले होते. तेलनाडे याला मटकाचालक सलीम हेपरगी याच्या खूनप्रकरणी अटक केली होती. त्यातून तो निर्दोष बाहेर पडला आहे. त्यानंतर भरत त्यागी खूनप्रकरणी त्याला अटक झाली.
सध्या तो जामिनावर बाहेर आहे. अनेक बेकार तरुणांना छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू करून देत तो त्यांची फौज आपल्याभोवती फिरवित होता; त्यामुळे इचलकरंजीमध्ये त्याला ‘सरकार’ म्हणून ओळखले जात होते. जमिनी, स्थावर मालमत्ता, आलिशान गाड्या, आदी कोट्यवधींची माया त्याने अवैध व्यवसायांतून मिळविली आहे. तेलनाडेचे उपद्व्याप वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी त्याच्यासह १८ साथीदारांना ‘मोक्का’ लावला.
‘मोक्का’ कारवाईची चाहुल लागताच तेलनाडे पसार झाला. इचलकरंजीमध्ये तो मटकाकिंग राकेश अग्रवाल याच्याशी हातमिळवणी करून मटका-जुगार चालवित असतानाही येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अग्रवालला अटक केली नाही. सलीम मुल्ला प्रकरणात शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी अग्रवालच्या मुसक्या आवळल्या. इचलकरंजीच्या गुन्हे शाखेला डॉ. देशमुख यांनी चारवेळा बोलवून तेलनाडेचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु पथकाकडून तेलनाडे सापडत नसल्याचे सांगितले जात होते. डॉ. देशमुख यांनी या पथकाच्या प्रमुखासह टिमला धारेवर धरत निष्क्रिय पथक असा ठपका ठेवत कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत काम करण्याच्या सूचना दिल्या; त्यामुळे हे पथक काही दिवसांपासून कोल्हापूरच्या एलसीबी टिमच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे.
इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेअंतर्गत काम करीत आहे. ‘मोक्का’ कारवाईतील पसार संशयित संजय तेलनाडे, सम्राट कोराणे यांचा आम्ही शोध घेत असून, लवकरच त्यांच्या मुसक्या आवळू.तानाजी सावंत : वरिष्ठ पोलीस निरीक्षक