नसीम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सोयाबीनच्या बाबतीत कृषी विभागाने कितीही नियोजन, प्रबोधन केले तरी कागदावरच राहिले असून शेतकऱ्यांना मात्र दुकानेच्या दुकाने पालथी घालावी लागत आहेत. महाबीज व खासगी कंपन्याकडून पुरवठाच होत नसल्याने शेतकऱ्यांसह कृषी विभागही हवालदिल झाला आहे. १३ हजार क्विंटल मागणीच्या तुलनेत केवळ १४ टक्के पुरवठा झाला आहे, त्यातही महाबीजकडून ७ टक्केच पुरवठा झाला आहे. एकूणच राज्यभरातील स्थिती पाहता कोल्हापुरात मागणीच्या ४० टक्के देखील पुरवठा होणार नाही असे सध्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात फेरपालटाचे पीक म्हणून सोयाबीनची लागवड केली जाते. तांबेरा व महापुरामुळे घटलेले क्षेत्र यंदा हमीभावाच्या दुप्पट म्हणजे ८ हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाल्याने सोयाबीन लागवडीचे क्षेत्र पुन्हा वाढणार आहे. पण त्या तुलनेत बियाण्यांची उपलब्धता नाही. याची पूर्वकल्पना असल्याने कृषी विभागाने १३ हजार क्विंटल घरगुती बियाण्यांची जोडणी लावून ठेवली आहे, पण सध्यस्थितीत बाजारात सोयाबीन बियाण्यांची उपलब्धताच नसल्याचे चित्र आहे. कृषी सेवा केंद्रांकडे विचारणा केली तर ॲडव्हान्स रकमा जानेवारीत भरूनदेखील अद्याप बियाणे आलेले नाही, मग कुठले देऊ, असे उत्तर ऐकावे लागत आहे.
अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या बीजोत्पादनावर परिणाम झाला आहे, त्यातच सर्वात मोठा पुरवठादार असलेल्या मध्यप्रदेश सीड कार्पोरेशनने बियाणे पाठवण्यास मनाई केली, आता पाठवण्यास सुरुवात केली आहे, पण वाहतुकीचा खर्च पाहता शेजारच्या जिल्ह्यालाच त्यांचे प्राधान्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बियाणे आले तरी ते कोल्हापुरात मिळेल याची शक्यता धूसर आहे.
उगवणक्षमता ७० टक्के असेल तरच बियाणे वापरण्याची शिफारस कृषी विभागाने केली आहे, पण शिल्लक असलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता कमी दिसत असल्याच्या तक्रारी आल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मागणी ३३५ व ९३०५ या वाणाला आहे, पण आजअखेर जीएस ३३५ चे ६०० क्विंटल उपलब्ध आहे. ९३०५ चे १७५ क्विंटल येणार असे सांगितले जात आहे, पण प्रत्यक्षात मिळालेले नाही.
दरात दुपटीने फरक
महाबीजच्या सोयाबीनची किंमत किलोला ७५ तर खासगी कंपन्याची किंमत १२० ते १४० रुपये अशी आहे. सरकारी व खासगीमध्ये जवळपास दुपटीने फरक येत आहे. स्वस्त असल्याने महाबीजची मागणी वाढली आहे, पण आजअखेर जिल्ह्यात मागणी नोंदवलेल्या ८ हजार ८९० क्विंटलपैकी केवळ ६९० क्विंटल म्हणजेच अवघा ७ टक्के बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. पुढील लॉट कधी येईल याची कोणतीही पूर्वकल्पना कृषी विभागाला नाही.
विक्रेते हवालदिल
कृषी सेवा केंद्र चालकांनी जानेवारीमध्येच महाबीजकडून सोयाबीनची मागणी नोंदवून ठेवली आहे. त्यासाठी किमान दीड लाख ते १५ लाखांची गुंतवणूक जिल्ह्यातून दीड हजाराहून अधिक कृषी सेवा केंद्रांनी केली आहे. पण मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने हे विक्रेते हवालदिल झाले असून, शेतकऱ्यांची मागणी वाढली असताना त्यांना तोंड द्यायचे कसा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र : ४१ हजार ५०० हेक्टर
लागणारे बियाणे : ३० हजार क्विंटल
केलेली मागणी : १३ हजार ६७६ क्विंटल
उपलब्ध :१९६५ क्विंटल (यात महाबीज ६९०, खासगी १२१३ क्विंटल)
फोटो - २८०५२०२१-कोल-सोयाबीन : संग्रहित छायाचित्र