कोल्हापूर : शिंगणापूर येथील उपसा केंद्रातील चारपैकी एक पंप जळाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहरातील निम्म्या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. सोमवारी सायंकाळी जळालेला पंप दुरूस्त करून नियमित उपसा सुरू झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे, आज मंगळवारपासून शहरात सगळीकडे सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.
बालिंगा तसेच शिंगणापूर येथील उपसा केंद्राकडील पंपामध्ये बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसांपासून शहरातील ई वॉर्डसह सम्राटनगर, राजेंद्रनगर, जवाहरनगर, शास्त्रीनगर, महालक्ष्मीनगर, पाण्याचा खजिना, तपोवन, साळोखेनगर आदी परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. नागरिकांच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली तेव्हा काही नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून अपुºया पाणीपुरवठ्याची माहिती दिली. त्यावेळी बालिंगा तसेच शिंगणापूर उपसा केंद्रातील एक-एक पंप नादुरूस्त असल्याचे लक्षात आले.
नगरसेवकांच्या दबावामुळे अधिकाºयांनी सोमवारी सकाळी पंप दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले आणि सायंकाळपर्यंत पूर्णही केले. वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत वेळीच लक्ष घातले असते, तर हा प्रसंग उद्भवला नसता, असे परिवहन सभापती नियाज खान यांनी सांगितले. पाणीपुरवठा अपुरा होणार असेल तर त्याची माहिती नगरसेवकांसह जनतेला दिली नाही, तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून पिण्याच्या पाण्याचे टँकरही दिले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
नियाज खान यांच्यासह काही नगरसेवक पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना घेरावो घालून त्यांचे वाहन काढून घेण्याच्या पवित्र्यात होते; परंतु महापौर बाहेरगावी गेल्यामुळे नगरसेवकांनी थोडे नमते घेतले. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तत्परतेने काम करत नाहीत, अशी तक्रार नगरसेवकांतून होत आहे.