कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे उद्घाटन ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजलीची भूमिका बजावलेला अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. कैद्यांच्या हस्तकलेतुन तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळीच्या फराळासह आकशदिवे, पणत्या, कपडे, लाकडी खुर्चा, खेळणी आदींचा समावेश आहे. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी त्यांचे स्वागत केले.कारागृहातील कैद्यांचे जीवन आणि याठिकाणी कैद्यांवर घडविले जाणारे संस्काराचे त्याने कौतुक केले.जीवनात कळत-नकळतपणे, अनवधानाने किंवा रागाच्या भरात घडलेल्या एका चुकीमुळे अनेक तरुण बंदी विविध कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत आहेत. जीवनातील उमेदीचा काळ कारागृहात घालविल्यामुळे शिक्षा भोगून कारागृहातून मुक्त झाल्यानंतर कुटुंबाच्या व स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी काय काम करायचे; रोजगार मिळेल का, हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. तसेच समाज कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या व्यक्तीस सहजासहजी मुख्य प्रवाहात सामावून घेण्यास इच्छुक नसतो; कारण ‘अपराधी’ या भावनेने त्याच्याकडे पाहिले जाते.
अशा काळात कारागृहातून बाहेर पडलेल्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण होऊ नये, समाजाने त्याचा पुन्हा एक माणूस म्हणून स्वीकार करावा; समाजाच्या मुख्य प्रवाहात अभिमानाने सामील होऊन त्याला उर्वरित जीवन सुखाने व्यतीत करता यावे; त्याच्या स्वत:च्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कारागृहात कौशल्य शिक्षण मिळायला हवे, या उद्देशाने कळंबा कारागृह प्रशासनाने बंदीजनांसाठी नऊ उद्योग सुरू केले आहेत. त्याकरिता लागणारी यंत्रे व साधनसामग्री उपलब्ध केली आहे.
फौंड्री, सुतार, लोहार, जरीकाम, टेलरिंग, कापडनिर्मिती, हातमाग, रंगकाम, बेकरी आदी विविध प्रकारचे उद्योग सुरू करून कळंबा कारागृहाने राज्यात नावलौकिक मिळविला आहे. ६०० बंदीजनांच्या हातून बनलेल्या आकर्षक वस्तूं दिवाळीनिमित्त कळंबा कारागृहाच्या प्रवेशद्वाराशेजारी विक्रीकेंद्रात ठेवल्या आहेत.
या स्टॉलचे उद्घाटनासाठी अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अक्षया देवधर कारागृहात शुक्रवारी सकाळी दहा वाजता आले. त्यांच्या स्वागतासाठी कारागृह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी गर्दी केली होती. त्यांनी कारागृहात कशाप्रकारे वस्तु तयार केल्या जातात त्याची प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली. त्यानंतर या दोघांच्या हस्ते स्टॉलचे उद्धाटन करण्यात आले. कारागृहाबाहेर आल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यासोबत मोबाईलवर सेल्फी घेतले.राणा-अंजली भारावलेअंबाबाईचा लाडू प्रसाद बनविणाऱ्या महिला कैद्यांशी राणा-अंजली यांनी संवाद साधला. लाडूची चवही चाखली. बेकरी, पणत्यावर नक्षीकाम करणाऱ्या तसेच मशीन विभागात काम करणाºया कैद्यांची मेहनत पाहून दोघेही भारावून गेले.