कोल्हापूर : कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमाने शाहू स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन १४ तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. तत्पूर्वी सकाळी अकरा ते दोन या वेळेमध्ये दिग्दर्शक घई हे विद्यार्थी व सिनेअभ्यासकांसाठी चित्रपट कार्यशाळा घेणार आहेत.
जोशी म्हणाले, यावर्षीच्या ६ व्या किफ महोत्सवामध्ये देश-विदेशातील चित्रपटांबरोबरच चित्रपट क्षेत्रातील तज्ञ लोकांचे मार्गदर्शन मिळवण्याची संधी कलाप्रेमींना होणार आहे. सुभाष घई यांच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी सभासद नोंदणी आवश्यक असणार आहे. तर १७ तारखेला अभिनेते अमोल पालेकर हे त्यांच्या थांग चित्रपटाबाबत रसिकांशी संवाद साधणार आहेत.
दिलीप बापट म्हणाले, चित्रपट महोत्सवामध्ये जागतिक, प्रादेशिक तसेच लक्षवेधी म्हणून व्हिएतनाम देशातील चित्रपट प्रथमच दाखवले जाणार आहेत. तर जपान, हंगेरी, स्विडन यासह भारतालगतच्या बांगलादेश, श्रीलंका या आशीयाई देशातील चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना उपलब्ध होणार आहे.
भारतातील मल्याळम, हिंदी, पहाडी यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट सादर होणार आहेत. महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांची गुरूवारपासून शाहू स्मारक येथे नोंदणी करण्यात येणार आहे.
चित्रपट महामंडळातर्फे पारितोषिक यंदच्यावर्षीपासून किफ्फमध्ये चित्रपट महामंडळाचा सक्रिय सहभाग असणार आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन म्हणून चित्रपट महोत्सवाअंतर्गत माय मराठी विभागातील विजेत्या चित्रपटांना व कलावंतांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे पारितोषिक देऊन गौरवण्यात आहे अशी माहिती महामंडळाचे कार्यवाह बाळा जाधव व सतिश बिडकर यांनी दिली.