कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती मिरवणुकीच्या स्वागतासाठी कमान उभारून मंगळवार पेठेतील ‘मावळा कोल्हापूर’ने दोन पेठांमध्ये सौहार्दाचा सेतू बांधला. बिनखांबी गणेश मंदिराच्या परिसरातील या कमानीचे रविवारी सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीत व उत्साही वातावरणात उद्घाटन झाले. यावेळी ‘तुमचं आमचं नातं काय... जय जिजाऊ - जय शिवराय...’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.आमदार चंद्रकांत जाधव व माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते फीत कापून ‘शहाजीराजे प्रवेशद्वार’या कमानीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, ‘मावळा कोल्हापूर’चे अध्यक्ष उमेश पोवार, नगरसेवक अजित राऊत, नगरसेवक उत्तम कोराणे, लालासाहेब गायकवाड, शाहीर दिलीप सावंत, श्रीनिवास श्ािंदे, बाबू चव्हाण, जयकुमार श्ािंदे, आदी प्रमुख उपस्थित होते.शिवजयंतीनिमित्त मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी येथे मावळा कोल्हापूरतर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे; तर शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीदिवशी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या मिरवणुकीच्या स्वागतासाठी ‘मावळा कोल्हापूर’तर्फे ही भव्य कमान उभारण्यात आली आहे. या निमित्ताने दोन पेठांमध्ये सौहार्दाचा सेतू बांधण्याचा प्रयत्न झाला आहे. इतर वेळी पेठापेठांमध्ये दिसणाऱ्या ईर्षेची धार कमी होण्यास ही कमान नक्कीच मोलाची ठरणार आहे.