लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलेला नाही. शासन आदेशाची रद्दी झाली तरी प्रोत्साहनपर अनुदान दिले नाही. दिवाळीला गोड बातमी देऊ असे जाहीर केले आणि आता वीज बिल भरले नाही म्हणून कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. हे आता सहन होत नाही. म्हणून २४ फेब्रुवारीला दसरा चौकात शाहू पुतळ्यासमोर एक दिवसाचे उपोषण करण्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
घाटगे म्हणाले, मी केवळ भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून नव्हे, तर शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारस, राज्यातील शेतकरी आणि सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून उपोषणाला बसणार आहे. त्या दिवशी सकाळी पत्नीसह अंबाबाईचे दर्शन घेऊन, या सरकारला सद्बुध्दी दे, अशी प्रार्थना करणार आहे आणि नंतर उपोषणाला सुरुवात करणार आहे.
सरकारच्या कारभाराबाबत बोलताना घाटगे म्हणाले, प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याचा आदेश काढला, परंतु ते दिले नाही. मायक्रोफायनान्स वसुलीमध्ये लक्ष घालू, असे सांगितले. त्यातही काही केले नाही. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे १० हजार देऊ, असे सांगितले. पण एकही रुपया दिला नाही. कोविड काळातील वीज बिले माफ करण्याचे आश्वासन तुमच्याच मंत्र्यांनी दिले. मग आता वसुलीच्या नोटिसा कशा पाठवता? हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांना फसवण्याचे काम करत आहे. या उपोषणानंतरही शासनाने काही निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ.
पत्रकार परिषदेला अमल महाडिक, अशोक चराटी, बाबासाहेब पाटील, महावीर गाट, भगवान काटे, वीरेंद्र घाटगे, राजवर्धन निंबाळकर, अशोकराव माने, नाथाजी पाटील, राहुल देसाई, पृथ्वीराज यादव, विश्वजित पाटील, डॉ. अरविंद माने, अजिंक्य इंगवले, अमित गाट उपस्थित होते.
चौकट
सहकारमंत्र्यांना कोल्हापुरात का आणलं
माझ्या शिवार संवाद यात्रेनंतर सहकारमंत्री कोल्हापुरात आले. त्यांनी प्रोत्साहनात्मक अनुदानासाठी उपसमिती नेमतो, ६०० कोटींची तरतूद करतो असे सांगितले. मात्र हे ते सांगली, सातारा जिल्ह्यात बोलले नाहीत, अधिवेशनात बोलले नाहीत, तर फ्क्त कोल्हापूर जिल्ह्यातच बोलले. कारण जिल्ह्यातील वातावरण तापल्यामुळे त्यांना कोणी तरी बोलावून आणले, असा टोला समरजित यांनी लगावला.
चौकट
शेतकऱ्यांची विचारपूस करणे हे नाटक कसे
शिवार संवाद यात्रा हे प्रसिध्दीसाठीचे नाटक आहे असे म्हणणाऱ्यांनी, महिलांना दागिने गहाण ठेवून कर्जे भरावी लागलीत, याचे भान ठेवावे. ज्यांचे पीक वाहून गेले, ज्यांना मायक्रो फायनान्सवाल्यांचा त्रास सुरू आहे. अशांची विचारपूस करणे हे नाटक आहे का, हे एकदा स्पष्ट करावे असे आवाहनही त्यांनी केले.