कोल्हापूर : खासगी प्रयोगशाळांनी कोविड १९ साठी आरटीपीसीआर तपासणी ७०० रुपयांमध्ये करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. तिसऱ्यांदा ही दर आकारणी कमी करण्यात आली आहे. ॲन्टिजेन टेस्टचेही दर कमी करण्यात आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात खासगी प्रयोगशाळांनी तीन हजारांपासून ते पाच हजारांपर्यंत दर लावून आरटीपीसीआर चाचण्या करण्यास सुरुवात केली. भीतीचे वातावरण असल्याने आणि खासगी प्रयोगशाळांत स्राव देण्याची नागरिकांची मानसिकता यामुळे भरमसाट दर आकारण्यात आले. याबाबत तक्रारी झाल्यानंतर ७ सप्टेंबरला शासनाने १२०० रुपये दर जाहीर केला. त्यानंतर ९८० रुपये व १४ डिसेंबरच्या आदेशानुसार आता तो ७०० रुपये करण्यात आला आहे. यातील आणखी दोन तपासणी अहवालांसाठी सर्व करांसहित अनुक्रमे ८५० आणि ९८० रुपये आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
रॅपिड ॲन्टिजेन टेस्टसाठीही नवी दर आकारणी जाहीर करण्यात आली आहे. रुग्ण प्रयोगशाळेत आल्यास ३०० आणि ३५०, एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास ३५० आणि ४५० आणि रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास ४५० ते ५५० रुपये आकारावेत, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.