कोल्हापूर : नवीन आयटी धोरणामध्ये कोल्हापूरचा समावेश करून सुशिक्षित स्थानिक युवक-युवतींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही ग्वाही दिली.कोल्हापूरसह ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवती आयटी कंपन्यातील नोकरीसाठी पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जातात. अशा सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा पातळीवर नोकरी उपलब्ध झाली पाहिजे. सध्या कोल्हापूर येथे आयटी केंद्र सुरू आहे; पण ते लहान स्वरूपात आहे. त्या ठिकाणी आणखी आयटी कंपन्या आल्या पाहिजेत; जेणेकरून नोकऱ्या वाढतील, अशी भूमिका आमदार आबिटकर यांनी मांडली होती.यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यात सध्याच्या घडीला आयटी हब उभा करण्याबाबत कोणतेही धोरण शासनाकडे नाही; परंतु नवीन आयटी सेंटर उभारणी करण्याबाबत धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात येईल. सध्या कोल्हापूरमधील आयटी पार्कमध्ये १ हजार ते १२०० जण काम करतात; परंतु या केंद्राच्या विस्तारीकरणासाठी प्रयत्न केले जातील.
नवीन आयटी धोरणामध्ये कोल्हापूरचा समावेश - उद्योगमंत्री उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 1:20 PM