कोल्हापूर : राज्य परिवहन मंडळाच्या (एस. टी.) कोल्हापूर विभागातील मध्यवर्ती बसस्थानक येथून दिवाळीनिमित्त सोडण्यात आलेल्या ११९ जादा बसगाड्यांतून सहा दिवसांत २० लाख २३ हजार १०६ रुपये इतके उत्पन्न मिळाले. त्यामुळे दहा टक्के प्रवासी भाडेवाढ करूनसुद्धा आठ दिवसांत या जादा गाड्यांचा लाभ २३ हजार ४०० प्रवाशांनी घेतला आहे. सरकारी कार्यालये व शाळा, महाविद्यालये यांना दिवाळीची सुटी पडल्याने गावी तसेच पर्यटनासाठी एस.टी.ने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने हा उत्साह ‘कॅश’ करण्यासाठी एस. टी. महामंडळाने ८ ते २५ नोव्हेंबरदरम्यान विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. गर्दीच्या हंगामात खासगी ट्रॅव्हल्स बसप्रमाणे दरवाढ करण्याची युक्ती यंदा महामंडळाने वापरायची ठरविले आहे. दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, यंदा दहा टक्के प्रवासी दरवाढ केली आहे. यामुळे एस.टी.च्या प्रवासीसंख्येवर परिणाम होणार अशी ओरड होत असताना पुन्हा एकदा सुरक्षित प्रवास व वेळेत गाडी सुटत असल्याने प्रवाशांनी एस.टी.ला पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कोल्हापूर विभागातील मध्यवर्ती बसस्थानकातून दिवाळीनिमित्त ११९ जादा एस.टी. बसगाड्यांचे नियोजन केले होते. या बसच्या माध्यमातून बेळगाव, पुणे, सातारा, सांगली, इचलकरंजी व हुबळी या मार्गांवर १४ हजार ९८ किलोमीटर इतक्या फेऱ्यांद्वारे २३ हजार ४०० प्रवाशांनी लाभ घेतला. यातून महामंडळास वीस लाख ४४ हजार १०६ रुपये इतके उत्पन्न मिळाले. ८ ते १३ नोव्हेंबरदरम्यान मिळालेले हे उत्पन्न असून २५ नोव्हेंबर रोजी जादा गाड्यांचे नियोजन केल्याने आणखी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
सहा दिवसांत वीस लाखांचे उत्पन्न
By admin | Published: November 15, 2015 1:01 AM