लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरातील मिळकती सर्वेक्षणाचे काम घेतलेल्या सायबर टेक कंपनीचे कर्मचारी नागरिकांना घरफाळा कमी करून देतो, आपणास पैसे द्या, अशी मागणी करून भ्रष्टाचार करत आहेत. संबंधित कर्मचारी व कंपनीवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम व भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. एक कर्मचारी पैसे मागत असल्याची चित्रफीतही त्यांनी पुरावा म्हणून महापालिका प्रशासनाला दिली आहे. कोल्हापूर शहरातील मिळकतींना घरफाळा आकारण्याकरिता ‘जीआयएस’ सर्वेक्षण करण्याचे काम सायबर टेक कंपनीकडे दिले आहे. चौदा महिन्यांत हे काम पूर्ण करायचे होते. या कंपनीचे कर्मचारी शहरातील मिळकतदारांच्या घरात जातात आणि त्यांच्याकडे तुमचा घरफाळा कमी लावतो, आम्हाला पैसे द्या, अशी मागणी करतात असा आरोप यापूर्वी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी महासभेत केला होता. त्याबाबत प्रशासनाने फारसे गांभीर्याने घेतले नाही. शुक्रवारी असा भ्रष्टाचाराचा आरोप गटनेते सत्यजित कदम व विजय सूर्ववंशी यांनी केला. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, एव्हर ग्रीन अपार्टमेंटमधील फ्लॅटधारक गौरव शेटके यांच्याकडे सायबर टेक कंपनीचे कर्मचारी गेले होते. त्यांनी तुमच्या फ्लॅटला १.५० लाख रुपये घरफाळा बसणार आहे. जर तो कमी करून पाहिजे असेल तर आम्हाला पंधरा हजार रुपये द्या, अशी मागणी केली. शेटके यांनी या कर्मचाऱ्यांसोबतचा संवाद रेकॉर्डिंग केला आहे. त्याची चित्रफीत आम्ही प्रशासनाकडे दिली आहे. या कंपनीला चौदा महिन्यांत हे काम पूर्ण करायचे होते; परंतु मुदत संपून गेल्यानंतरही केवळ पंचवीस टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्यांचे काम काढून घ्यावे आणि केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी कदम यांनी केली. पैसे मागत असल्यास तक्रार करावीसर्वेक्षणावेळी कोणी पैसे मागत असेल तर त्याबाबत आयुक्त किंवा घरफाळा विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन या विभागाचे प्रमुख दिवाकर कारंडे यांनी केले आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घरफाळा ठरविण्याचा अधिकार नाही. त्यांनी फक्त मिळकतीची मापे घेऊन नोंद करायची आहे. ज्यांचे वाढीव बांधकाम झाले आहे, अशा मिळकतधारकांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलाविणार आहोत. त्यानंतर घरफाळ्याची रक्कम निश्चित होणार आहे, असे कारंडे यांनी सांगितले.
मिळकत सर्वेक्षणात भ्रष्टाचार
By admin | Published: July 01, 2017 1:00 AM