कोल्हापूर : इन्कम टॅक्सच्या नव्या पोर्टलमध्ये शेकडोच्या संख्येने तांत्रिक त्रुटी असल्याने रिटर्न भरण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारने ७ जून २०२१ ला सुरू केलेल्या इन्कम टँक्सच्या नवीन पोर्टलने अक्षरश: करदात्यांसह कर सल्लागारांच्या नाकात दम आणला आहे.
करदात्यांना आयकर भरणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने इन्फोसिससारख्या दिग्गज आयटी कंपनीला करदात्यांसह कर सल्लागारांकरिता नवीन पोर्टल तयार करण्याची जबाबदारी दिली. त्यानूसार कंपनीने हे पोर्टल तयारही केले. मात्र, कोणतीही चाचणी न करता घाईगडबडीने हे पोर्टल वर्षाच्या मध्येच सुरू केले. त्यात शेकडोच्या संख्येने त्रुटी राहिल्याने गेल्या अडीच महिन्यांत करदात्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे पूर्वीच्या पोर्टलमध्ये कोणतीच समस्या नसताना नवीन पोर्टल आणण्याचा घाट घालण्यात आला. लहान करदात्याकडून लहानसहान चुकीकरिता मोठ्या प्रमाणात दंड, लेट फी अशी वसूल केली जाते. शासनाने करदात्याला सेवामधील त्रुटीकरिता काही देणे लागते की नाही. अडीच महिन्यांत २ ते ३ टक्केच आयकर दात्यांनी आतापर्यंत रिटर्न फाईल केले आहेत. हेच मागील वर्षी नियमित पोर्टलवरून ७० टक्केपेक्षा अधिक होते. शनिवारी (दि. २१) ते रविवारी मध्यरात्रीपर्यंत ही पोर्टल अचानक बंद करण्यात आली होती. असा गोंधळ अमेरिका किंवा प्रगत राष्ट्रात झाला असता तर कंपनीला मोठा दंड लागला असता. विशेष म्हणजे हे पोर्टल तयार करणाऱ्या कंपनीने जीएसटीमध्येही असाच गोंधळ केला आहे. त्यामुळे करदात्यांसह कर सल्लागारांना आता दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न पडला आहे.
त्रुटी अशा,
- रिटर्न फाॅर्म्स युटीलिटी उपलब्ध नाही.
-फाॅर्म साॅफ्टवेअरमधून भरायला तांत्रिक मंजुरी मिळत नाही. काही फाॅर्म भरायच्या तारखा वाढवण्यात आल्या आहेत.
- असेसमेंट, अपील अशा महत्त्वाच्या सेवांमध्ये अडचणी आहेत.
-वेगवेगळ्या एजन्सीज, बॅंकर्स यांना पाहिजे असलेली विवरणपत्रे किंवा इतर सर्टिफिकेट देता येत नाहीत.
काय केले पाहिजे होते.
- नवीन पोर्टलसह जुने पोर्टलही काही दिवस सुरू ठेवले पाहिजे होते.
- पॅरलल रन ही संकल्पना राबवली पाहिजे होती.
-नवीन पोर्टल बनविताना कर सल्लागार, सीए आदींचे मत घ्यायला हवे होते.
कोट
रिटर्न भरता येत नसल्याने अनेक लाेकांना कर्ज घेताना अडचणी येत आहेत. नवीन पोर्टलमध्ये असंख्य त्रुटी आहेत. कर संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना कर सल्लागारांना विश्वासात घेऊन त्यांची मदत घेतल्यास भविष्यात अशा अडचणी निर्माण होणार नाहीत.
-सीए दिपेश गुंदेशा, कर सल्लागार.