कोल्हापूर : रत्नागिरी, देवगडहापूस आंब्यांची आवक कमी झाली असली तरी मद्रासच्या हापूस व पायरीने आंबा मार्केट स्थिर ठेवले आहे. गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला व कडधान्यांचे दर स्थिर राहिले असून कांद्याचे मार्केट मात्र घसरले आहे. घाऊक बाजारात कांदा सरासरी सहा रुपयांपर्यंत खाली आला आहे. उष्म्यामुळे कोकणातून हापूस आंब्याची आवक कमी राहिली. त्यात मुंबई, पुणे मार्केटमधून हापूसला मागणी असल्याने यंदा कोकणातील शेतकऱ्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरविली. सध्या रोज सरासरी दोन हजार पेट्या व साडेचार हजार बॉक्सची आवक कोकणातून होते. त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आवक मद्रास व कर्नाटकातून हापूसची होत आहे. कर्नाटकातून ‘लालबाग’ची आवक चार हजार बॉक्स, तर ‘मद्रास’मधून दोन हजार पेट्या, तर अडीच हजारांहून अधिक बॉक्सची आवक होऊ लागली आहे. त्याचबरोबर मद्रास पायरीची आवकही तेवढीच होत आहे. मद्रास हापूसची आवक वाढल्याने दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. कोबी, ओली मिरची वगळता इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. वांग्याचे दर घाऊक बाजारात सरासरी १३ रुपये, तर टोमॅटो १५ रुपयांपर्यंत राहिले आहेत. ढब्बू, गवार २० रुपये, भेंडी १७ रुपये असे प्रमुख भाज्यांचे दर आहेत. मेथी, पालक, पोकळा या पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पेंढीचा दर दहा रुपये राहिला आहे. साखर, सरकी तेल, तीळ, जिरे, खोबरे, धने यांसह हरभराडाळ, तूरडाळ, मूग, मटकीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. शाबू ४० रुपयांपर्यंत खाली आला असून चटणी करण्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने मिरचीची मागणी स्थिर आहे. कांद्याची आवक वाढली आहे. बाजार समितीत दिवसाला सरासरी २२ हजार पिशव्यांची आवक होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. बाजार समितीत कांद्याचा सरासरी सहा रुपये किलो असा दर आहे. बटाट्याच्या आवकेबरोबर दरही स्थिर आहे.
‘देवगड’ची आवक कमी; बाजारात ‘मद्रास हापूस’चा गोडवा
By admin | Published: May 16, 2016 2:13 AM