लोकमत न्यूज नेटवर्क
रुकडी माणगाव - महापुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सरकारने वाढीव नुकसानभरपाई द्यावी.याकडे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
पूरग्रस्तांच्या न्याय मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी रुई येथे चौदा गावातील शेतकऱ्यांची बैठक झाली.याप्रसंगी ते बोलत होते.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, पंचगंगा नदीमुळे हातकणंगले तालुक्यातील आठ गावांना फटका बसला. हजारो एकरातील ऊस पीक खराब झाले आहे. झालेले आर्थिक नुकसान हे भरून निघणार नसून शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.मदत करताना हात आखडता घेऊ नये.नुकसानभरपाईसंदर्भातील निर्णय बदलावा यासाठी शेतकऱ्यांनी २३ तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
याठिकाणी अनेक पूरबाधित नागरिक यांनी व्यथा व अडचणी मांडल्या तसेच नदीपात्राची रुंदी व उंची वाढण्यासाठी नदीतील वाळू उपसा व माती उत्खनन्नास परवानगी द्यावी अशी मागणी बहुतांश शेतकऱ्यांनी केली.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, तालुकाध्यक्ष आप्पा येडके,माजी तालुकाध्यक्ष राजाराम देसाई, माजी उपसभापती अरुण मगदूम, कुमार जगोजे, रमेश भोजकर, ॲड. सुरेश चौगुले ,आण्णासोा मगदूम उपस्थित होते.
चौकट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंचगंगा नदी ते अलमट्टी बोगद्यापर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज बांधण्याचे पर्याय एका सभेत सुचविल्याचा दाखला देण्यात आला.यावर पंचगंगा पुरावर हा पर्याय नसल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.
Sent from Yahoo Mail on Android