कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सूक्ष्म नियोजन करतानाच तपासण्या व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, अशा सूचना जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी गुरुवारी केल्या. कोरोना वाढेल असे गृहित धरूनच व्हेटिलेंटर्ससह कोविड केअर सेंटर सुसज्ज ठेवण्याबाबतचे आदेशही त्यांनी दिले.
पालक सचिव देवरा यांनी आढावा बैठक घेऊन कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीचा खर्च, कोविडवरील उपाययोजनांवर झालेला आतापर्यंतचा खर्च आणि कोविड लसीकरण मोहीम याबाबतही सविस्तर माहिती घेतली.
बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत पालक सचिवांना अहवाल सादर करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी, जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ४५ हजार ९७९ जणांनी कोरोना चाचण्या करून घेतल्या आहेत. लसीकरणाचा पहिला टप्पा संपून दुसरा सुरू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२८ टक्के असल्याचे सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संभाजी माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, समाजकल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी उपस्थित होते.
चौकट ०१
जिल्हा नियोजनचा खर्च तातडीने करा
बैठकीत जिल्हा नियोजन समितीकडून झालेल्या खर्चाचा आढावा नियाेजन अधिकारी विजय पवार यांनी सादर केला. सर्वसाधारणमध्ये २६.७९ टक्के, अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी ३९.४५ टक्के खर्च झाला असल्याचे त्यांनी सांगितले. खर्चाची टक्केवारी कमी असल्याने तो वेळेत करावा, अशा सूचना देवरा यांनी केल्या. महाआवास अभियानात कामाची टक्केवारी कमी असल्याने ती वाढविण्याची सूचनाही त्यांनी केली.
चौकट ०२
४४ कोटी ५० लाखाच्या निधीची मागणी
कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून २८ कोटी ३८ लाख ६३ हजार, तर एसडीआरएफमधून २९ कोटी २४ लाख ६९ हजाराचा निधी जिल्ह्याला आला आहे. अजूनही १६ कोटी १४ लाख ४० हजार ३८७ रुपयांचे अनुदान प्रलंबित असल्याने देयके थकली असल्याची बाब पालक सचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. अजूनही ४४ कोटी ५० लाख ३२ हजाराच्या निधीची गरज आहे, तो देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी बैठकीत झाली.
फोटो: १८०२२०२१-कोल-देवरा मिटींग
फोटो ओळ:
कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कोविड कामाचा आढावा घेतला. त्यास सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.