कोल्हापूर: राज्य शासनाने गाय दूधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी दूध संघांनी किमान ३० रुपये दर देणे बंधनकारक आहे. यासाठी ‘गोकुळ’ने कार्यक्षेत्राबाहेरील सांगली, सोलापूर व सीमाभागातील गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ करुन ३० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहीती ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली.
गाय दूध पावडर व बटरचे दर जागतिक बाजारपेठेत कमी झाल्याने राज्यातील दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात केली होती. अशा काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान सुरु केले, पण त्यासाठी दूध संघांनी किमान ३० रुपये दर देणे बंधनकारक केले आहे. ‘गोकुळ’ कोल्हापूर जिल्ह्यातील गाय दूध ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ साठी ३३ रुपये दर देते. पण, कार्यक्षेत्राबाहेरील याच प्रतीच्या दूधाला २८ रुपये ५० पैसे दर देते. कार्यक्षेत्राबाहेरील दूध उत्पादक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी ‘गोकुळ’ने प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ करुन ३० रुपये दर केला आहे.वाढीव दराची १ जुलै पासून अंमलबजावणी करण्यात येणार असून संबधित दूध संस्थांना सुधारीत दरपत्रक पाठवले जाणार असल्याची माहीती अध्यक्ष डोंगळे यांनी दिली आहे.
या जिल्ह्यातील दूध उत्पादकांना होणार फायदासांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, कर्नाटक.