कोल्हापूर : दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये केल्या जाणाऱ्या दस्त नोंदणीच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने दस्त हाताळणी शुल्क २० रुपयांवरून ४० रुपये केले आहे. शुल्कात थेट दुपटीने वाढ झाल्याने कोल्हापूरकर पक्षकारांच्या खिशाला कात्री लागली आहे. जिल्ह्यात वर्षाला सरासरी ८२ हजारांवर दस्त होतात. जिल्ह्यात वर्षाला किमान ८२ हजार दस्त होतात. प्रत्येक दस्त हाताळणीचे १२०० रुपये याप्रमाणे ९ कोटी ८४ लाख रुपये होतात. आज, गुरुवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाला ‘बांधा, वापरा, हस्तांतरण करा’ या तत्त्वावर खासगीकरणाच्या माध्यमातून संगणकीकरण करणे, संगणकीकरणांतर्गत येणाऱ्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कन्झ्युमेबल, मनुष्यबळ यांच्या दरात तसेच स्वीय प्रपंची लेख्यातून खर्च करायच्या बाबींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागातील खासगीकरणाच्या माध्यमातून येणारा खर्च भागवण्यासाठी दस्त हाताळणी शुल्क २० रुपयांवरून ४० रुपये केले आहे.कोल्हापुरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये याप्रमाणे आय-सरिता सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल व त्याची चाचणी एनआयसी विभागाकडून बुधवारी करण्यात आली. त्या बदलानुसार आज, गुरुवारपासून दस्त हाताळणीचे वाढीव शुल्क आकारण्यात येणार आहे.
६०० वरून १२०० वर
- स्थावर मालमत्तेचे खरेदी-विक्री व्यवहार झाले किंवा फेरफार झाले की, त्या मूळ दस्ताची सही, शिक्क्यानिशी एक कॉपी पक्षकाराला दिली जाते.
- या कॉपीसाठी प्रति कागदाला २० रुपये आकारले जात होते. ती रक्कम आता प्रति कागदासाठी ४० रुपये केली आहे.
- एका दस्त नोंदणीमध्ये किमान ३० पाने असतात. त्यानुसार पूर्वी ६०० रुपये होत असलेली रक्कम आता १२०० रुपयांवर गेली आहे. ६०० रुपयांप्रमाणे ४ कोटी ९२ लाख रुपये वर्षाला होतात. पण आता १२०० रुपयांप्रमाणे ८२ हजार दस्तांची रक्कम ९ कोटी ८४ लाख झाली आहे. ही रक्कम पक्षकाराकडून घेतली जाते.
नक्कलसाठी ५ रुपये..दस्त नोंदणीची आणखी एक नक्कल पक्षकाराला हवी असेल तर मुद्रांक विभागाकडून त्याची नक्कल दिली जाते. त्यासाठी प्रति कागद ५ रुपये शुल्क घेतले जाते. त्यात काही वाढ झालेली नाही.