अविनाश कोळी
सांगली : नवरात्रीच्या उत्सवात उत्साहाचे रंग भरले असताना उपवासाच्या पदार्थांनी महागाईची वस्त्रे पांघरली आहेत. केळी वेफर्सना कृत्रिम टंचाईचा व दरवाढीचा फटका बसला आहे तर अन्य पदार्थांना पिकांच्या नुकसानीमुळे महागाईच्या तराजूत तोलावे लागत आहे. सध्या बाजारात केळी वेफर्सचा तुटवडा निर्माण झाला असून राजगिऱ्याने दरात राजेशाही थाट मिरविण्यास सुरुवात केली आहे.नवरात्र म्हणजे उपवासाचा काळ असल्याने उपवासाच्या पदार्थांना या काळात मोठी मागणी असते. यंदाही नवरात्रीत मागणी अधिक आहे. मागणी वाढली असतानाच हे पदार्थ महागले आहेत. त्यामुळे ग्राहकांतून नाराजीचा सूरही आहे. राजगिऱ्याचा सध्या जुना माल संपण्याच्या मार्गावर असल्याने दर वाढत आहेत. गुजरातमधून येणारा माल महागला आहे. शेंगदाणा, गूळ व साखरेच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाली आहे.
घाऊक बाजारातील दर (प्रतिकिलो)पदार्थ - गत आठवड्यात - नवरात्रीतकेळी वेफर्स - १६० - २००बटाटा वेफर्स - १५० - २००राजगिरा - १२५ - २००शेंगदाणा चिक्की - १३० - १६०बटाटा चिवडा - २०० - २००शाबू चिवडा - २०० - २००
केळी वेफर्सचे उत्पादन घटलेकर्नाटकातील व्यापाऱ्यांनी कच्च्या केळीचा दर १० रुपयांवरून ३० रुपये केला. दुसरीकडे वेफर्स उत्पादकांनी दर परवडत नसल्याने उत्पादन कमी केले. त्यामुळे बाजारात सध्या मागणीच्या तुलनेत २० टक्केच माल उपलब्ध आहे.
शेंगदाणा, साखर, गुळाच्या दरात वाढमागील आठवड्यात घाऊक बाजारात ११० रुपये असणारा शेंगदाणा आता १४० रुपयांवर गेला आहे. ३६ ते ३८ रुपये किलो असणारा गूळ आता ४२ ते ४५ रुपयांवर तर साखर ३७ वरून ४२ रुपये किलो झाली आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांचे दरही वाढले आहेत.
सध्या उपवासाच्या पदार्थांना मागणी असली तरी दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे. केळी वेफर्सचा मोठा तुटवडा आहे. राजगिऱ्याचा नवा माल अद्याप बाजारात आला नसल्याने दरात वाढ होत आहे. - गणपती जाधव, व्यापारी