कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा आज रविवारी पहाटे तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला.
राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी १७ फूट असून पाणी पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचा ६ चा स्वयंचलित दरवाजा उघडला असून स्वयंचलित दरवाजा व पॉवर हाऊसमधून एकूण २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.
दरम्यान, गेल्या महिना भरापासून पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. त्यामुळे या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी काहीसा सुखावला आहे.