तानाजी पोवार
कोल्हापूर : सावधान...!! शिया, सिया, शीतल, सोनाली, सोनाक्षी, प्रिया, दीपा या तरुणींच्या मोहजालात अडकवून अनेक व्यापारी कंगाल होत आहेत. झटपट लाखो रुपये कमवण्याचा गुंडाचा तसा हा जुनाच म्हणजे २०१७ पासूनचा, पण पोलिसांची आताच नजर पडल्याने नवा फंडा म्हणावा लागेल. ‘ती माझी बहीण- पत्नी आहे, त्यांची अब्रु लुटलीस, तुझ्यावर बलात्काराचाच गुन्हा नोंदवतो, तुझा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनाम करतो, अशा धमक्या देत या बड्या पैसेवाल्यांना ‘ब्लॅकमेल’ केले जात आहे. बदनामीच्या भीतीने ते पोलिसांकडे जात नाहीत. हाच धागा पकडून हे त्याची अहोरात्र आर्थिक पिळवणूक सुरू होते.
तरुणींच्या मोहजालात अडकवून त्यांच्या साथीदारांना लाखो रुपये खंडणी देत असाल, तर तुमची ही आर्थिक पिळवणूक कदापिही थांबणार नाही. मोहजालात अडकवलेल्यांकडून झटपट लाखो रुपये कमवायचे, त्यांना बदनामीची धमकी द्यायची, मग झाले फत्ते काम. त्यातूनच त्यांचा लुबाडणुकीचा गेम होतो. खून, मारामाऱ्या, कुळं काढणं, खंडणी यांसारख्या गुन्ह्यात वेळ जातो तसेच पोलिसांचीही नेहमीच करडी नजर राहते. म्हणून पोलिसांना चकवा देऊन गुन्हेगारांनी हा नवा ‘हनीट्रॅप’चा मार्ग चोखाळला. व्यापाऱ्यांची गेले काही महिने, वर्ष खंडणी रुपाने आर्थिक पिळवणूक सुरू आहे. हे रोखण्यासाठी फसलेल्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे. आतापर्यंत पाच तक्रारी दाखल झाल्या, आणखी होण्याची शक्यता आहे.
अनोळखी महिलेशी चॅटिंग पडेल महागात
‘हनीट्रॅप’ करण्यापूर्वी बडे पैसेवाले शोधून त्यांच्यावर नियोजनबद्ध ट्रॅप लावला जातो. सुंदरीबरोबर चॅटिंग, त्यानंतर मिटिंग व पुढे लुबाडणुकीचे सेटिंग’ याचा अवलंब केला जातो, त्यामुळे अनोळखी महिलेशी चॅटिंग करत असाल तर सावधगिरी बाळगा.
महापालिकेचे पाच नगरसेवक
‘हनीट्रॅप’मध्ये महानगरपालिकेच्या मावळलेल्या सभागृहातील पाच नगरसेवकही गुंतल्याची चर्चा आहे. काहींनी बदनामीच्या भीतीने संबंधित महिलेला पैसेही दिले, नगरसेवकांना कोल्हापूर शहराच्या उत्तरेकडील हिलस्टेशनवरील लॉजवर नेऊन लुबाडल्याची चर्चा आहे. त्यापैकी एक नगरसेवक व्यावसायिक आहे, तर दोघांचा त्यांच्याच फ्लॅटवर ‘हनीट्रॅप’ झाल्याचे समजते. ‘हनीट्रॅप’साठी एकाच महिलेचा वापर वारंवार केल्याची चर्चा आहे. अनेक नगरसेवकांना Need friends in your Location? For datting, chatting, Frendship. plz call on [Name] 100/ Privacy assured. असे मेसेज आले, तर काहींना थेट नवा मित्र जोडायचा आहे म्हणून मराठीतूनही मेसेज व्हॉट्सॲपवर आलेत.
युवती वापरतात ‘टोपन’ नावे
आतापर्यंत युवतींची अनेक नावे तपसात पुढे आली, पण त्यांची टोपन नावे आहेत. त्यांची मूळ नावे व राहण्याचा पत्ता नेहमीच गोपनीय ठेवला आहे. त्यामुळे गुंड मिळाले तर दोनच महिला पोलिसांच्या हाती लागल्या, इतर महिलांही हाती आल्यावर नगरसेवक, बडे व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांची नवे पुढे येतील.