कोल्हापूर : दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये तर निर्यात होणाºया दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची योजनेला राज्य सरकारने ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
राज्यात अतिरिक्त गाय दुधाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्यात पावडर करण्यास लागणाºया दुधाला अनुदान व थेट दूध निर्यातीलाही अनुदानाची योजना सुरू केली होती. त्याची मुदत ३१ आॅक्टोबरपर्यंत होती पण या कालावधीत दूध पावडरचे दरात वाढ न झाल्याने पुन्हा दूध संघाची अडचणी वाढत आहेत. शासनाने अनुदान पुढे कायम करण्याचा निर्णय घेतला नव्हता, त्यात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अनुदान कायम करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याचा अध्यादेश नसल्याने राज्यातील खासगी व काही सहकारी दूध संघांनी गायीच्या दूध खरेदी दरात कपात केली आहे. त्यामुळे पुन्हा दूध दराचा प्रश्न गंभीर होणार असे वाटत असतानाच राज्य सरकारने अनुदान कायम ठेवण्याचा अध्यादेश काढला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे दूध अनुदान योजनेला ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दूध पावडर अनुदानाची मुदत मात्र २१ जानेवारी पर्यंतच राहणार असल्याचे समजते. या निर्णयामुळे राज्यातील दूध संघांना दिलासा मिळाला आहे.