लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : दूध दरवाढीबाबत २० जूनपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्याने दूध संघांच्या पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. दूध खरेदी बरोबरच विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याबाबत विचार सुरू असला तरी त्याचा मार्केटवर काय परिणाम होईल, याचीही धाकधूक संघांना आहे. कर्जमाफीसह दुधाच्या दरवाढीबाबत राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोेषणा सरकारने केली आहे. त्याचबरोबर दूध उत्पादकांना किती दरवाढ देता येईल, याबाबत राज्यभर चाचपणी सुरू केली आहे. जिल्हानिहाय दूध संघाच्या प्रतिनिधींच्या बैठका घेऊन आढावा घेतला जात आहे. दूध संघांचा सध्याचा दर व त्यामध्ये किती वाढ देता येईल, याची माहिती दुग्ध विभागाकडून घेतली जात आहे. कोल्हापूरचा विचार करायचा झाल्यास ‘गोकुळ’सह इतर संघांचा दर राज्यात अग्रेसर आहे. त्यामुळे सरकारने राज्यपातळीवर दरवाढीचा निर्णय घेतला तरी ‘गोकुळ’च्या दरात फारशी तफावत राहणार नाही. तरीही शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन उत्पादकांच्या पदरात काहीतरी टाकण्यासाठी ‘गोकुळ’ दूध संघाच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. सरकारने दरवाढ जाहीर करण्याअगोदरच संघाने वाढीची घोषणा करावी, असाही एक मतप्रवाह आहे; पण सरकार नेमकी किती दरवाढ करते, ते पाहूनच वाढीबाबत निर्णय घेतलेला चांगला होईल, असे काहीजणांचे मत आहे. सध्या ‘गोकुळ’चा म्हैस दुधाचा सरासरी दर प्रतिलिटर ४६, तर गाय दुधाचा २९ रुपये आहे. यामध्ये दोन रुपयांची वाढ करायची म्हटली तर विक्रीतही वाढ करावी लागणार आहे. सध्या ‘गोकुळ’चे म्हैस दूध मुंबईत ५४ रुपये लिटर आहे. दोन रुपयांची वाढ झाली तर तो दर ५६ रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याने त्याचा विक्री मार्केटवर निश्चित परिणाम होणार आहे. चौकट-‘अमूल’च्या एंट्रीने सावध भूमिका‘अमूल’ने विक्री मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. कोल्हापूर जिल्"ात अद्याप त्यांच्या हाताला फारशे लागले नसले तरी ‘गोकुळ’सह इतर संघांनी दोन रुपयांची विक्रीत वाढ केली, तर थोडासा परिणाम होऊ शकतो. सध्या कोल्हापुरात ‘गोकुळ’चे म्हैस दूध ५२ रुपये आहे. त्यात दोन रुपयांची वाढ झाली तर दर ५४ रुपयांवर पोहोचणार आहे. ‘अमूल’चे दूध ५० रुपयाला मिळणार असेल, तर लिटरमागे चार रुपयांचा फरक राहू शकतो. याचाही विचार संघाच्या पातळीवर सुरू असल्याचे समजते.
दूध दरात दोन रुपयांची वाढ शक्य
By admin | Published: June 10, 2017 8:19 PM