कोल्हापूर : ओशियाना फुटबॉल कॉन्फेडरेशन, युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड व राज्य सरकारतर्फे ‘जस्ट प्ले’ या उपक्रमाअंतर्गत कोल्हापुरातील पूरग्रस्त शिरोळ व करवीर तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या १० शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेविषयी जागृती व आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन व ‘विफा’तर्फे फुटबॉलचे प्राथमिक धडे दिले जाणार आहेत, अशी माहिती ‘विफा’चे उपाध्यक्ष मालोजीराजे व सचिव साऊटर वाझ यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांवर पडलेला मानसिक ताण कमी करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम देशभरात राबविला जात आहे. त्यात महाराष्ट्र हे पहिले राज्य असून, मुंबईनंतर कोल्हापुरात असा उपक्रम घेण्यात येत आहे.
यात कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील सहा व करवीर तालुक्यातील शिंगणापूर (२), वडणगे व गडमुडशिंगी येथील प्रत्येक एक अशा १० जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या सर्वांना कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन ग्रास रूट लीडर्स आरोग्य व स्वच्छता या विषयांबरोबर फुटबॉलचे प्राथमिक धडेही देणार आहेत.
पुरामध्ये या भागातील शाळांमधील दप्तरे, क्रीडासाहित्यही वाहून गेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता पूर परिस्थितीला विसरू शकत नाही. त्यातून विद्यार्थ्यांची मने बाहेर यावीत, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासोबतच हसत-खेळत फुटबॉलचेही धडे दिले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना फुटबॉलचे किटही दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या ग्रासरूट लीडर्सना ‘जस्ट प्ले’च्या प्रकल्प व्यवस्थापिका वेंडी डिकोस्टा या प्रशिक्षित केले आहे.यानिमित्त बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, वैयक्तिक स्वच्छता, मानसिक ताण दूर करण्यासाठीचे धडे व फुटबॉलचेही तंत्रशुद्ध धडे या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्याचा निश्चितच या विद्यार्थ्यांना फायदा होईल. जिल्हा परिषदेतर्फे मैदानांसह सर्व सुविधाही या उपक्रमासाठी पुरवू.यावेळी जेन्युरिटा डिसोझा, माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, प्रा. अमर सासने, नितीन जाधव, संभाजी पाटील-मांगोरे, दीपक राऊत, संजय पोरे, मंगेश देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.