लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ब्रिटन आणि अन्य देशात नव्याने आढळलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध रहावे. मास्कचा वापर बंधनकारक करावा. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा. अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवा. पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार व त्याअनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी याबाबत आढावा घेतला. ते म्हणाले, स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का, त्यावरील उपचार पद्धती याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले प्रवासी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यांच्याबाबतीत जागरुकता ठेवावी. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरण करणारी यंत्रणा, पहिल्या टप्प्यात ज्यांना लस द्यावयाची आहे त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा संकलित करून तो पाठविणे, शीतगृहांची व्यवस्था, प्रशिक्षण यांचा आढावा घेतला.
--
इंदुमती गणेश