कोल्हापूर : छाप्यांचे प्रमाण वाढवा, त्याकरिता सर्व अत्यावश्यक मदत करू, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. ते अनैतिक व्यापार प्रतिबंध जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत गुरुवारी बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, अनैतिक प्रतिबंध व्यापार प्रतिबंध कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांच्यासह समिती सदस्यांची उपस्थिती होती. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी सायंकाळी ही बैठक झाली.'
सद्य:स्थितीत एक मूल व ११ महिला या तेजस्विनी शासकीय महिला वसतिगृहात दाखल आहेत तसेच १६ प्रवेशिता दाखल आहेत. इमारतीतील ४० प्रवेशितांची क्षमता असून त्यांच्या अडचणींसंबंधी चर्चा करण्यात आली. छाप्यात अधिक महिला पकडल्या असल्यास त्यांना जिल्ह्यातील आधारगृहात तसेच सांगली, सातारा येथील व महिला वसतिगृहात पाठविण्यात येथे, असे जिल्हा महिला बालविकास अधिकारी व सदस्य सचिव नितीन म्हस्के यांनी सांगून पुढील त्रैमासिक सभा ३ मे रोजी घेण्यात येईल, असे सांगितले.
सदस्या प्रियदर्शनी चोरगे म्हणाल्या, इचलकरंजी येथील संतोषीमाता या नियमबाह्य संस्थेवर ६ फेब्रुवारी २०१८ रोजी कारा सदस्यांनी छापा टाकून नऊ मुले ताब्यात घेतली. ही मुले बालकल्याण समिती, कोल्हापूर यांच्यासमोर दाखल करण्यात आली आहेत. यात पाच मुली व चार मुले असून मुलांपैकी दोन मुले १८ वर्षांपेक्षा पुढील वयाची असल्याने पालकांच्या ताब्यात देण्यात आली. पाच मुली व दोन मुले ही संस्थेत ठेवण्यात आली आहेत.
यानंतर तिरूपती काकडे म्हणाले, पालकांच्या ताब्यात मुलांना देतेवेळी कमीत-कमीत ५ ओळखपत्रे घ्यावीत. अनाथ, दिव्यांग मुलांचे पुनर्वसनाबाबत अनिवासी शाळेबाबत चर्चा करण्यात आली आहे. या अनिवासी शाळा या समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे असल्याने अनाथ, दिव्यांग मुलांना त्या शाळेत प्रवेश दिल्यास दिवाळी व उन्हाळी सुटीच्या कालावधीत पालक नसल्याने त्यांना रजेवर कोणाकडे सोडावे या तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यात आली.
त्यावेळी किती दिव्यांग मुले आहेत त्याची यादी करून त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा तसेच पुनर्वसनाकरिता अत्यावश्यक असणारे थेरपिस्ट यांचे मानधनाबाबत रोटरी क्लब यांच्याशी चर्चा करावी, असे काकडे यांनी सांगितले.बैठकीस सदस्य सुशांत शिरतोडे, एस. ए. थोडगे, उमेश लिंगनूरकर, सागर दाते, डॉ. प्रमिला जरग, वर्षा पाटोळे, माधवी घोडके, जयश्री पाटील, सुजाता शिंदे, ई. एम. बारदेस्कर, एम. एम. अष्टेकर उपस्थित होते.अनैतिक व्यापार प्रतिबंध जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात मार्गदर्शन केले. या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.