कोल्हापूर : कोरोनाचा कहर वाढू लागल्यानंतर पहिली लस घेण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांसह आरोग्य केंद्रात एकच गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सावित्रीबाई फुले रुग्णालय, रुईकर काॅलनी, फिरंगाई, राजारामपुरी आदी ठिकाणी लसीकरणासाठी उभारलेल्या नागरिकांमध्ये वादावादीचे चित्र होते. रांगेत उभारूनही टोकन न मिळाल्याने अनेकांचा संताप चेहऱ्यावर दिसून येत होता.
गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासन कोरोनापासून बचाव होण्यासाठी ४५ वर्षांवरील लोकांकरिता लसीकरण मोहीम जोरदारपणे राबवत आहे. पहिले काही दिवस लोकांना या लसीकरणाचे महत्त्व वाटले नाही. त्यामुळे अनेकांनी आता घेऊ, नंतर घेऊ असे करीत टंगळमंगळ केली. त्याचा परिणाम म्हणून संसर्ग वाढू लागल्यानंतर अनेकजण सावध झाले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लस टोचून घेण्यासाठी एकच गर्दी करू लागले आहेत. येणाऱ्यांची संख्या आणि लसी यांचे गणित जुळेनासे झाले आहे. शिल्लक असेल तर टोकन मिळत होते. नाही तर तासन् तास रांगेत उभारूनही, लस तर मिळाली नाहीच, उलट मनस्ताप झाला, अशी प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळाली.
दुपारी एक वाजता सावित्रीबाई फुले रुग्णालयात २०० जणांकरिता लस उपलब्ध होती. मात्र, रांगेत उभारलेल्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे वादावादीचे प्रसंग घडले. अशीच परिस्थिती रुईकर काॅलनीतही होती. तेथेही अनेकजण रांगेत उभारले होते. त्यांना लस नाही, पण जे थेट रांगेविना आतमध्ये गेले, त्यांना लस मिळाली; अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
ऑनलाईन टोकन द्या
महापालिका
फोटो : २२०४२०२१-कोल-सावित्रीबाई फुले ०१,०२,०३
ओळी : कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात गुरुवारी लस टोचून घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
(छाया : आदित्य वेल्हाळ )