राधानगरी : महाराष्ट्राचे मानचिन्ह अशी ओळख असलेल्या ‘शेखरू’ या प्राण्याचे राधानगरी अभयारण्यात मोठ्या प्रमाणात अस्तित्व असल्याचे आढळले आहे. या प्राण्याच्या गणतीसाठी गत आठवड्यात झालेल्या विशेष मोहिमेत अभयारण्यात २००८ घरटी आढळली. त्यानुसार येथे किमान ४०० शेखरू असल्याचा अंदाज असून, यावेळी कर्मचाऱ्यांना १५२ शेखरूंचे प्रत्यक्ष दर्शन झाले आहे.शेखरू हा खार प्रजातीतील प्राणी आहे. अंगावर तांबूस, तपकिरी किंवा गडद चॉकलेटी रंगाने चकाकणारे केस, पोटाखालचा व शेपटीचा अर्धा भाग गडद पांढऱ्या रंगाचा, टपोरे डोळे, छोटेसे कान, झुपकेदार शेपटीचा गोंडा, असा हा खूप देखणा प्राणी आहे. रंगरूपातील फरक सोडला, तर मोठी खारच असल्याचा भास होतो. कोवळी पाने, फुले, तसेच फळे खाऊन गुजराण करणारा हा प्राणी उंच झाडावरच असतो.शेखरू स्वत:ला राहण्यासाठी उंच झाडावर झाडाच्या काड्या, पाने याचा वापर करून किमान सात ते आठ घरटी बांधतो. वापरात असलेली, मोडकळीस आलेली, दुरुस्तीची गरज असलेले, सोडून दिलेली गर्भ घरटी अशी त्याची विभागणी असते. ही घरटी घुमटाकार असतात. डिसेंबर ते जानेवारी हा काळ या प्राण्यांच्या विणीचा हंगाम असतो. या काळात नर-मादी एकत्र राहतात. एक महिन्याच्या गर्भार काळानंतर मादी एकावेळी एका पिलाला जन्म देते. या काळात मादी घरट्यात पिलांचे सहा ते दहा महिने संगोपन करतात.राज्यात महाराष्ट्राचे मानचिन्ह अशी याला मान्यता दिली आहे. भीमाशंकर अभयारण्यात याचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर पश्चिम घाटात यांचे अस्तित्व काही प्रमाणात होते. त्यांची यापूर्वी स्वतंत्रपणे गणना झालेली नव्हती. गेल्या आठवड्यात १८ ते २२ एप्रिल या काळात ही गणना झाली. त्यावेळी २००८ घरटी आढळली. त्या प्रमाणात किमान चारशे शेखरू येथे असल्याचा वनकर्मचाऱ्यांचा अंदाज आहे. यावेळी १५२ शेखरूंचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचेही वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)लाजाळू व भिन्न असा हा प्राणी शक्यतो दाट जंगलात राहतो; पण येथे हत्तीमहाल मार्गावर वन्यजीवचे कार्यालय असलेल्या परिसरात अनेक दिवसांपासून एक जोडी फिरताना दिसते. या झाडावरून त्या झाडावर, झाडाच्या शेंड्यापर्यंत, तर कधी जमिनीपर्यंत सरसर धावणारा हा रंगीत देखणा प्राणी सहज नजरेस पडतो. जंगलाला लागूनच हा परिसर आहे.
राधानगरी अभयारण्यात ‘शेखरूं’च्या संख्येतवाढ
By admin | Published: April 29, 2015 9:39 PM