भारत चव्हाण / कोल्हापूर : येत्या शनिवारपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला असला तरी त्यासंबंधीच्या मार्गदर्शन सूचना अद्याप राज्य सरकारला प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे नियोजनात अडथळा आला असला तरीही मोठ्या प्रमाणातील लसीकरण मोहिमेला केवळ चार दिवस राहिले असल्याने आपली यंत्रणा वाढविण्यासह जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील खासगी रुग्णालये, संस्थांचा सहभाग वाढविण्याचे ठरविले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ४५ वर्षे वयाच्या वरील सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. आता अठरा वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे काम शनिवारपासून (दि.१ मे) सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयास सध्याची लसीकरणाची यंत्रणा दुपटीने वाढवावी लागणार आहे. आजमितीस सर्व सरकारी यंत्रणा या कार्यात आधीपासूनच व्यस्त आहे. त्यामुळे सध्याची यंत्रणा दुप्पट करणे प्रशासनास अशक्य आहे. त्यासाठी खासगी संस्था, खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. तो वाढविला तरच लसीकरणाची मोहीम सुरळीत सुरू होईल, अन्यथा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती उद्भवू शकते.
१८ वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना राज्याला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राज्य सरकार आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा संभ्रमात आहे. खासगी रुग्णालयांचा, संस्थांचा सहभाग वाढवायचा तर ते मोफत काम करणार नाहीत. त्यांना मोबदला हा द्यावा लागणार आहे. तो कशा पद्धतीने आणि कोणी द्यायचा, याबाबत स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवायचा तर कशा प्रकारे हाच संभ्रम आहे.
१८ ते ४४ वर्षे मोफत की सशुल्क?
केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणाची गती वाढावी म्हणून या कामात खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला. ज्यांना सरकारी केंद्रावर लस घ्यायची आहे, त्यांना मोफत आणि ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची त्यांनी २५० रुपये शुल्क देऊन घ्यावी, अशा सूचना होत्या; पण आता नवीन घोषणेनुसार १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना लस मोफत द्यायची की सशुल्क द्यायची, याबाबतचे स्पष्टीकरण झालेले नाही.
पंधरा लाखांनी लाभार्थी वाढणार-
जिल्ह्यातील लसीकरणाच्या मोहिमेत ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांची संख्या ही १५ लाख ९१ हजार ४४९ इतकी आहे, तर सरकारी-खासगी रुग्णालये, शहरी-ग्रामीण अशा ३१० केंद्रांवर ही मोहीम राबिवली जात आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या पंधरा लाखाने वाढणार आहे. केंद्रांची संख्यादेखील ६२० च्या पुढे वाढवावी लागणार आहे.
-जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी -
- जिल्ह्यातील लाभार्थी उद्दिष्ट पहिला डोस दुसरा डोस
- हेल्थ केअर वर्कर- ३८,२५६ ३९,५४९ १९,२०४
- फ्रंटलाइन वर्कर - २९,८२१ ४५,७०३ १४,८०१
- ४५ वर्षांवरील नागरिक- १५,२३,३३७ ६,८२६९५ ४८,६२१
एकूण - १५,९१,४४९ ७,६७,९४७ ८२६२६
कोट -
१८ वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाबाबत अद्याप मार्गदर्शक सूचना अजून मिळालेल्या नाहीत. तरीही आम्ही खासगी रुग्णालयांचा या मोहिमेत सहभाग वाढविणार आहोत. आमची यंत्रणाही जेथे वाढविणे शक्य आहे तेथे वाढविण्याचे नियोजन करीत आहोत.
डॉ. फारुक देसाई,
जिल्हा लसीकरण अधिकारी