कोल्हापूर : चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम आणि हानीकारक रंगांनी त्वचेचे होणारे नुकसान यामुळे यंदा इको फ्रेंडली रंगांना मागणी आहे. अनेकजणांनी घरगुती रंग बनवण्यास प्राधान्य दिले. तर ग्राहक रंग खरेदी करताना रंग स्थानिक आहेत ना, याची खात्री करीत असल्याचे चित्र आहे.उद्या शुक्रवारी सर्वत्र रंगपंचमी साजरी होत आहे. हा सण म्हणजे सगळ््यांना आपल्या रंगात रंगून टाकणारा दिवस. यानिमित्त मांडलेल्या विविध रंगांनी बाजारपेठ रंगली आहे. सध्या चीनसह अनेक देशांत धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा धसका सगळ््याच क्षेत्रांनी घेतला आहे.
रंगपंचमीला खेळले जाणारे रंग, पिचकाऱ्या यातील बऱ्यापैकी साहित्य चीनमधून येते. मात्र गेल्या दीड महिन्यापासून चीनमधील उद्योग बंद असल्याने तेथून कोणत्याही साहित्यांची आवक झालेली नाही. शिवाय गेल्या काही वर्षांत चायनीज उत्पादने खरेदी करण्यास जाणीवपूर्वक टाळले जाते.
या सगळ््याचा परिणाम म्हणून यंदा रंगपंचमीच्या बाजारातून चायनीज रंग आणि पिचकाऱ्या हद्दपार झाल्या आहेत. जे काही चायनीज रंग विक्रीसाठी आहेत, ते खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल नाही. उलट स्थानिक रंगांची आवर्जून मागणी केली जात आहे.शहरात पापाची तिकटी, बाजारगेट, पानलाईन, महापालिका परिसर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, मिरजकर तिकटी, गंगावेश, राजारामपुरी येथील बाजारपेठेत रंग आणि आकर्षक पिचकाऱ्या मांडल्या आहेत. कोरडे रंग आणि पाण्यातले रंग अशा दोन प्रकारांत हे रंग उपलब्ध आहेत.
खडी, पावडर व लिक्विड स्वरूपातील रंग खरेदी केले जात आहेत. जांभळा, लाल, निळा असे गडद रंग तसेच पाण्यातले रंग २० रुपयांना डबी याप्रमाणे विकले जात आहेत. सुट्टे रंग व पावडर दहा रुपयांपासून शंभर रुपयांच्या पॅकेटमध्ये आहेत. पिवडीला सध्या सर्वाधिक मागणी असून तर पाच किलो रंगाच्या पोत्याचा दर ४० रुपयांपासून ६० रुपयांपर्यंत आहे.रंगाच्या पोते खरेदीलाही प्रतिसाद मिळत असून, लहान मुलांसाठी पालकांकडून नैसर्गिक रंगाच्या खरेदीला मागणी आहे. रंगपंचमी सणातील महत्त्वाचा घटक असलेल्या रंगांच्या निवडीपासूनच पर्यावरणपूरकतेवर भर देण्याकडे कोल्हापूरकरांचा कल वाढत आहे. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारात नैसर्गिक रंगांना वाढत असलेल्या मागणीमुळे पर्यावरणपूरक रंगपंचमीला कोल्हापूरकरांचा यंदाही प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.पीठ,भाज्यांपासून रंगगेल्या काही वर्षांत निसर्गमित्रसारख्या संस्था व शाळांमधून दिले जाणारे इको फ्रेंडली रंगांचे प्रशिक्षण यामुळे लहान मुलांमध्येही पर्यावरणपूरक रंगांविषयी जागरुकता वाढली आहे. अनेक विद्यार्थी गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर आणि खायचा रंग यापासून घरगुती पद्धतीने रंग बनवत आहेत. नैसर्गिक रंगांमध्ये तांदळाची पिठी, कॉर्नफ्लोअर आणि शाबुदाण्याच्या पीठापासून बनवलेले रंग उपलब्ध आहेत. याशिवाय पालक, बीट यापासून रंग बनवण्यात येत आहेत.
सध्या चायनीज रंग आणि पिचकाऱ्या बाजारपेठेत कमी आहेत. हे रंग आता खरेदी केले जात नाहीत. उलट स्थानिक रंगांना आणि साहित्यांना मोठी मागणी आहे. त्यातही प्रामुख्याने नैसर्गिक रंगांची विचारणा केली जाते.इरफान मणेर,व्यावसायिक