.
फोटो ओळी : महागोंड, ता. आजरा येथे आरोग्य तपासणी करताना कर्मचारी.
उत्तूर : महागोंड (ता. आजरा) येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असून यामुळे चिंताजनक वातावरण बनले आहे. आतापर्यंत कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ रुग्ण कोरोनाबाधित झाले. अडीच हजार लोकवस्तीचे गाव भीतीच्या छायेखाली आहे.
महागोंड येथे बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने उत्तुर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात लक्षणे असणाऱ्या ग्रामस्थांची अँटिजेन तपासणी सुरू केल्याने अनेक ग्रामस्थ कोरोना बाधित आढळले आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्ती व सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधित यांना अलगीकरणात ठेवले आहे. तर काही जणांवर आजरा कोविड व उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे उपचार सुरू आहेत.
कोरोना समिती, ग्रामपंचायत, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक यांनी घरोघरी नोंदणी सुरू केली आहे. ऑक्सिजन लेव्हल व तापमान यांच्या नोंदी केल्या जात आहे. गावातून माणसांना बाहेरगावी जाण्यास प्रतिबंध केला आहे. कोरोनाचा संक्रमण आणखी वाढू नये म्हणून कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
शेतीची कामे सुरू
अलगीकरणात असलेली व्यक्ती सोडून शेतीची कामे करण्यास परवानगी दिली आहे. गावात व गावाच्या बाहेर जाताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे . शेतीची कामे नेहमीप्रमाणे सुरू आहे. ग्रामस्थांनी खबरदारी घेऊन काम करावे, अशी सूचना ग्रामपंचायतीने केली आहे.