कोल्हापूर : जिल्ह्यासाठी आज शुक्रवारपासून १५ टन ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा चार पट वाढीव पुरवठा सुरू झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असून, पुढील आठवड्यापर्यंत सगळं सुरळीत होईल, असंही ते म्हणाले.डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीच्या उपाययोजना, ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्यासाठी मी स्वत: व पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुंबईत पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून आज जवळपास तिप्पट -चौपट इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत.
यापूर्वी जिल्ह्याला रोज ३० टन ऑक्सिजन पुरवठा होत होता तो आता १५ टनाने वाढून ४५ टन इतका होणार आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत झाला असून, आजच अडीच हजारावर इंजेक्शन मिळाले आहेत. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी बेड उपलब्ध आहेत. कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून, आठवड्याभरात हे सर्व आटोक्यात येईल.
जिल्ह्यात मृत्यूदर जास्त असला तरी आपण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. ही परिस्थिती फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर आता वाढलेलाच आहे.मुंबईत कोरोना परिस्थितीत सुधारणा करत ऑक्सिजनचे मॅनेजमेंट केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारचा गौरव केला आहे. दुसऱ्या लाटेशी यशस्वी संघर्ष केल्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. परवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे कौतुक केले आहे. हे सर्व एका बाजूला होत असताना, भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी आमदार अमल महाडिक दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत.