लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या महिन्याभरात महानगरपालिका प्रशासनाने कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी अत्यंत नियोजनपूर्वक प्रयत्न करून टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या वाढविली. चाचणीचे अहवाल लवकर येण्यापासून ते बाधित रुग्णांपर्यंत लवकर पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच १२.०८ वर गेलेला पॉझिटिव्ही रेट ७.७४ टक्क्यांपर्यंत खाली आला, असा दावा महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.
जूनच्या पहिल्या आठवड्यात १८ हजार ३८८ चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यात २२२२ बाधित रुग्ण आढळून आले होते. पॉझिटिव्हीटी रेट १२.०८ इतका होता. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ३३ हजार ०७७ चाचण्या करण्यात आल्या, त्यावेळी २५६० रुग्ण आढळले. पॉझिटिव्हीटी रेट ७.७४ टक्क्यांपर्यंत खाली आला. टेस्टिंग, पॉझिटिव्ह रुग्ण जास्त दिसत असले तरी पॉझिटिव्हीटी पूर्णपणे नियंत्रणात आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात प्रशासनाने स्वॅब घेण्यासाठी अकरा केंद्रे स्थापन केली. स्वॅबचे अहवाल कमीत कमी वेळेत कसे मिळतील यावर लक्ष केंद्रीत केले. अहवाल मिळताच दोन तासांत आमचे कर्मचारी त्या रुग्णापर्यंत पोहोचले. रुग्णांवर उपचार सुरू केले. त्याच्या संपर्कातील लोकांचे तातडीने गृहअलगीकरण केले. त्यावर कडक नजर ठेवली. त्यामुळे नव्याने होणारा संसर्ग रोखण्यात यश मिळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- एक लाख १९ हजार चाचण्यांचा उच्चांक-
१७ जून ते १४ जुलै या एक महिन्यात महापालिका क्षेत्रात आम्ही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या १ एक लाख १९ हजार ६३५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ९१ हजार ३९९ व्यक्तींच्या आरटीपीसीआर तर २८ हजार २३६ अँटियन चाचण्यांचा समावेश आहे. शासनाच्या सूचनांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्याचे बलकवडे यांनी सांगितले.
- गरोदर मातांना सोमवारपासून लसीकरण -
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गरोदर मातांना येत्या सोमवारपासून लसीकरण केले जाणार आहे. सध्या आठवड्यात एक दिवस लसीकरणासाठी राखीव ठेवला असला तरी लाभार्थ्यांची संख्या पाहून आणखी एक दिवस वाढविला जाईल, असे सांगण्यात आले.