कोल्हापूर: टपाल स्विकारण्याच्या वेळेत १ तास ३0 मिनिटांनी वाढ करण्याच्या डाक कार्यालयाच्या उपक्रमाला कोल्हापुरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे ही सुविधा आता आणखी १८ कार्यालयामध्ये शुक्रवारपासुन सुरु झाली. तसेच उशिरा स्विकारलेले टपाल जलद गतीने गोळा करणे व रेल्वे डाक सेवेकडे पाठवणे अधिक वेगाने व्हावे म्हणून विशेष रिक्षाही सुरु करण्यात आली आहे.कोल्हापूरातील मुख्य पोस्ट कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांच्या हस्ते व प्रवर अधिक्षक आय.डी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी या सेवेचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन झाले.झपाट्याने विकसीत होणाऱ्या कोल्हापूर शहरातील नागरीक तसेच व्यावसायिकांच्या पत्रव्यवहार व दळणवळणातील वाढत्या गरजा, ग्राहकांच्या सोयीसाठी टपाल स्विकारण्याच्या वेळेत वाढ करण्याचा उपक्रम कोल्हापूर डाक विभागाने राबवला. त्यासाठी जिल्ह्यातील १४ प्रमुख पोस्ट कार्यालये निवडण्यात आली.
येथे रोजच्या वेळेपेक्षा १ तास ३0 मिनिटांनी टपाल स्विकारण्यास सुरुवात झाली. २0 आॅगस्ट ते १४ नोव्हेबर या कालावधीत या १४ कार्यालयातून ९ हजार ५३८ रजिस्टर टपाल, ८ हजार ४३२ स्पीड पोस्ट, ६२१ पार्सल याचे संकलन वाढीव वेळेत करण्यात आले.