लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नेहमी गजबजलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात खासगी प्रवासी आरामबस उभ्या करण्यास निर्बंध असतानाही तेथे नियमांचे उल्लंघन करीत या आराम बसेस बिनदिक्कत उभ्या करून वाहतुकीची प्रचंड कोंडी केली जाते. या आरामबसेसचे प्रवासी बुकिंग करणाऱ्या एजंटांची या भागात प्रचंड गुंडगिरी व मुजोरगिरी सुरू असून, त्यातून अनेक वेळा प्रवाशांना व नागरिकांना मारहाणीचे प्रकारही घडल्याचे निदर्शनास येत आहे. सायंकाळी सात वाजल्यानंतर तर या परिसराचा ताबा जणू या बुकिंग एजंटांनीच घेतलेला असल्याचे चित्र दिसते. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात श्री महालक्ष्मी चेंबर्स आणि जेम्स स्टोन ही दोन व्यापारी संकुले असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यापैकी महालक्ष्मी चेंबर्सच्या इमारतीत बहुतांश खासगी आरामबस कंपन्यांची बुकिंग कार्यालये आहेत. या परिसरात वाहनांची व प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी होते. या परिसरात खासगी आरामबस उभ्या करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यांना प्रवासी उचलसाठी थांबण्याबाबत ताराराणी चौकानजीक जागा देण्यात आल्या आहेत; पण तरीही या खासगी आराम बसेस मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरातच रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उभ्या करून वाहतुकीची कोंडी निर्माण केली जाते. याबाबत जाब विचारणाऱ्यांनाही येथे खासगी गुंडांकरवी मारहाण केली जात असल्याचे प्रकार घडले आहेत. दिवसभरात या ठिकाणी सुमारे १०० हून अधिक खासगी प्रवासी आराम बसेसचे जाणे-येणे सुरू असते. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, हैदराबाद, आदी ठिकाणी येथून मोठ्या प्रमाणात आराम बसमधून प्रवासी ये-जा करतात; पण येथे प्रवाशांना आपल्याच बसेसमध्ये बुकिंग करून घेण्यावरून या एजंटांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. त्यातून हाणामारीचे वारंवार प्रकार घडत आहेत. फूटपाथची मालकी कोणाची? मध्यवर्ती बसस्थानक चौकातील महालक्ष्मी चेंबर या व्यापारी संकुलातील वाहनांचे पार्किंग त्याच इमारतीच्या तळघरात आहे; पण या व्यापारी संकुलातील प्रवासी बुकिंग कंपन्यांच्या कार्यालयांनी या संकुलासमोरील फूटपाथवर जणू मालकी हक्कच प्रस्थापित केला आहे. या फूटपाथची मालकी ही महापालिकेची असतानाही या फूटपाथवरही या आरामबसेस उभ्या केल्या जातात. तसेच अनेक प्रवासी बुकिंग कंपन्यांच्या कार्यालयांबाहेर फूटपाथवर लोखंडी बार लावून या जागेवर मालकी हक्क दाखविला आहे. येथे अनेक दुचाकी वाहनेही उभी केली जातात. या दुचाकीधारकांनाही या बुकिंग एजंटांच्या गुंडगिरीचा फटका बसला आहे. बुधवारी दुपारी असाच त्रास कांही लोकांनाही बसला. स्टँडवरीलही प्रवाशांची उचल खासगी आरामबसेसमध्ये प्रवासी बुकिंग करून भरण्यासाठी या कंपन्यांचे एजंट एस. टी. स्टँडच्या आवारात जाऊन प्रवाशांना भूलथापा मारून आपल्या आराम बसेसकडे वळवितात. त्यामुळे एस. टी. महामंडळाचा तोटाच होतो. त्यावरून अनेक वेळा एस. टी.चे अधिकारी आणि एजंटांमध्ये हाणामारीचे प्रकारही घडले आहेत. अशा पद्धतीने स्टँडमध्ये प्रवाशांची उचल करण्यासाठी कोणत्याही खासगी आराम बसेसच्या एजंटाला स्टँडच्या परिसरात प्रवेश नसतो; पण हे एजंट चक्क एस. टी. अधिकाऱ्यांनाच दमदाटीचे प्रकार करतात. या एजंटांना काही राजकीय गुंडांचा वरदहस्त आहे. त्यामुळे पोलीसही आपले काय वाकडे करू शकत नाहीत, अशी त्यांची मुजोरी वाढली आहे. त्याला चाप लावणे महत्त्वाचे आहे.
स्टँड परिसरात आरामबस एजंटांची वाढती गुंडगिरी
By admin | Published: June 22, 2017 1:18 AM