लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरात गेल्या सहा महिन्यांपासून ५५० हून अधिक बेकायदेशीर केबिन लागल्या असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार शुक्रवारी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आली. वाढत्या अतिक्रमणांविरुद्ध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप नेजदार होते. शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा सत्यजित कदम, उमा इंगळे यांनी उपस्थित केला. शहरातील वाढते अतिक्रमण काढायचे सोडून ते वाढत असताना प्रशासन काहीच करत नाही. गेल्या सहा महिन्यांत ५५० हून अधिक केबिन अनधिकृतपणे टाकण्यात आल्या आहेत. शहरातील चौकांचे त्यामुळे विद्रुपीकरण होत आहे.बिंदू चौक तर अशा केबिनच्या अतिक्रमणांमुळे कोंडीत सापडला आहे. कोणत्याही चौकाच्या ५० मीटर क्षेत्रात केबिनला परवानगी नाही, तरीही या नियमाचे उल्लंघन होत आहे. एकीकडे अतिक्रमण वाढत असताना प्रशासन मात्र कारवाई करण्यास कचरत आहे. वाढत्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी,असे कदम व इंगळे यांनी प्रशासनास बजावले. त्यावेळी हातगाड्या, टपऱ्या, केबिन काढण्याची मोहिम हाती घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कामाच्या फाईल प्रलंबित आहेत म्हणून मागच्या दोन सभा तहकूब करण्यात आल्या होत्या. किती फाईल निर्गत झाल्या, किती प्रलंबित आहेत याची वॉर्डनिहाय माहिती सभागृहात द्यावी, अशी सूचना दिलीप पोवार, अफजल पिरजादे यांनी केली. त्यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले की, गांधी मैदान कार्यालयाकडील ६५ फाईल्स कार्यवाहीत आहेत. शिवाजी मार्केट कार्यालयाकडून ७२ कामांच्या फाईल पूर्ण झाल्या असून ६७ कामांच्या फाईल कार्यवाहीत आहेत. राजारामपुरी कार्यालयाअंतर्गत १५० फाईल मंजूर झाल्या आहेत. ताराराणी मार्केटच्या ५० कामे टेंडर प्रक्रियेत आहेत तर ७५ कामे कार्यवाहीत आहेत. सर्व फायलींची निर्गत लवकरात लवकर करावी, अशा सूचना सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. सभेत झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत रिना कांबळे, मनीषा कुंभार, कविता माने, आशिष ढवळे, जयश्री चव्हाण, नीलोफर आजरेकर, आदींनी भाग घेतला.
अनधिकृत केबिनच्या वाढत्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2017 1:04 AM