कोल्हापूर : गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची दुसरी लाट घेण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या २४ तासांत नवीन ८० कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. फक्त कोल्हापूर शहरात तब्बल ४२ नवे रुग्ण आढळल्याने हा विषय गांभीर्याने घेण्याची प्रशासनावर वेळ आली आहे. सुदैवाने, दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या आठवडाभरात वेगाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत तब्बल ८० नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही ५१ हजार २८७ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात ३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात ५१४ रुग्णावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर शहरात गेल्या २४ तासांत ४२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. करवीर तालुक्यात पाच, हातकणंगले व गडहिंग्लज तालुक्यात प्रत्येकी चार, भुदरगड व राधानगरी तालुक्यात प्रत्येकी दोन, तर चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ या तालुक्यांत प्रत्येकी एका नव्या रुग्णाची वाढ झाली आहे.
आठवडाभरात वाढते नवे रुग्णसंख्या
सोमवार- ३८, मंगळवार- २५, बुधवार- ४६, गुरुवार- ६२, शुक्रवार- ८३, शनिवार- ८१, रविवार- ८० रुग्ण.