कोल्हापूर : विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील करिअरविषयक शेकडो प्रश्नांची उत्तरे देणारे ‘लोकमत’चे ‘अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनास विविध संस्थांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. ११ ते १३ जूनपर्यंत असणार्या या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना आयुष्याच्या वाटचालीची गुरुकिल्ली मिळणार आहे. व्ही. टी. पाटील सांस्कृतिक भवन येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन होणार आहे. महेश ट्युटोरियल्स लक्ष्य हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून, संजीवन इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट पन्हाळा हे सहप्रायोजक आहेत. पारंपरिक सीमा ओलांडून करियरच्या नव्या वाटा धुंडाळणार्या आजच्या पिढीला योग्य असे मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’ने या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनामध्ये कोल्हापुरासोबतच सातारा, सांगली, रत्नागिरी, पुणे येथील व्यवस्थापन, अभियांत्रिकी, फॅशन डिझायनिंग, फायर अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, संगणक, अशा विविध नामवंत शैक्षणिक संस्थांचे स्टॉल्स आहेत. त्याचबरोबर रोज तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्रे होणार आहेत. एकाच छताखाली विद्यार्थी व पालकांना इत्यंभूत माहिती मिळणार असल्याने करिअरच्या वाटा शोधणे सहज शक्य होणार आहे. यावर्षीदेखील या प्रदर्शनाची उत्सुकता शैक्षणिक क्षेत्रात शिगेला पोहोचली असून स्टॉल बुकिंग सुरू आहे. स्टॉल बुकिंगसाठी ०९८८१८६७६०० या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
‘एज्युकेशन फेअर’ला वाढता प्रतिसाद
By admin | Published: May 26, 2014 1:11 AM