शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा निवडणुकीचा ‘फिवर’ चांगलाच जोर धरत आहे. कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी लावून काम सुरू केले आहे. प्रचारासाठी अगोदरच कमी कालावधी असल्याने उन्हाची पर्वा न करता प्रचार राबविला जात असल्याने कार्यकर्त्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.उमेदवारी अर्जांचे सोपस्कार पूर्ण झाले असताना, आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गावोगावी भेटी सुरू केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तापमान थोडे कमी असले तरी या आठवड्यात पारा आणखीनच वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मार्चपासूनच वाढलेला पारा आता चाळिशीपर्यंत जात आहे. उन्हामुळे दुपारी गावे ओस पडलेली असतात. अशावेळी प्रचारयंत्रणा राबविताना कार्यकर्त्यांना चांगलाच ‘घाम’ फुटत आहे. या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण राहणार असले तरी, दिवसभरात उन्हाचा पाराही ४१ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यामुळे प्रचार करताना कार्यकर्त्यांना आपल्या प्रकृतीचीही अधिक काळजी करावी लागणार आहे. दुपारच्या ऐन उन्हात प्रचारासाठी बाहेर न पडता, सायंकाळी बाहेर पडणेच सोयीस्कर ठरणार आहे.उन्हात फिरणे टाळा, भरपूर पाणी प्यागेल्या आठ दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सर्वत्रच उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वाढत्या उन्हात बाहेर पडणे टाळावे. जास्त पाणी प्यावे व सकस आहार घ्यावा. जेणेकरून वाढत्या उन्हाचा शरीरावर परिणाम होणार नाही. या आठवड्यात ढगाळ वातावरण असले तरी परत ऊन वाढणार आहेच. थकवा, डोके दुखणे, उलट्या होणे, मळमळ असा त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. उमेश पुजारी, खरसुंडीहे आहेत उपाय...1. तीव्र उन्हात दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान बाहेर जाणे टाळावे. हलक्या रंगाच्या प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या व सुती कपड्यांचा पेहराव असावा.2. आपला चेहरा, डोके पांढऱ्या कपड्याने झाकूनच उन्हात बाहेर पडावे.3. कार्बोनेटेड पेयांऐवजी लिंबू सरबत, लस्सी, ताक अशी पेये घ्यावीत. शीतपेयांचे भरपूर सेवन करावे.4. घराबाहेर पडताना स्कार्फ, टोपी, गॉगलचा अथवा छत्रीचा वापर करावा, मद्य, चहा, कॉफीचे सेवन टाळावे.
वाढत्या उन्हात प्रचार : कार्यकर्त्यांनो, आधी सांभाळा तुमचे आरोग्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 10:31 PM