कोल्हापूर : सरकारच्या बाबतीत मागचा अनुभव चांगला नाही, तरीदेखील १५ दिवस थांबा असे ते म्हणतात म्हणून थांबत आहे. आयआयटीचा अहवाल आला आणि मागणीप्रमाणे आश्वासन नाही पाळले तर ५ एप्रिलनंतर राज्यभर जनआंदोलनाला आगडोंब उसळेल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. महावितरणसमोरील बेमुदत धरणे आंदोलनाची १५ व्या दिवशी सांगता करतानाच शेट्टी यांनी आंदोलनाच्या बी प्लॅनची घोषणा करून त्याची सुरुवात आज बुधवारपासूनच राज्यभरातील दौऱ्यापासून होणार असल्याचेही जाहीर केले.
दिवसा दहा तास विजेसाठी स्वाभिमानीने कोल्हापुरात महावितरणसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. सोमवारी उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वाभिमानीने दिलेल्या प्रस्तावावर १५ दिवसात निर्णय घेऊ, तोपर्यंत आंदोलन स्थगित करा असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले होते; पण कार्यकर्त्यांशी बोलूनच पुढील निर्णय घेऊ असे शेट्टी यांनी सांगितले होते, त्यानुसार मंगळवारी सकाळी शेट्टी यांनी स्वाभिमानीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी तासभर चर्चा केली. त्यानंतर आंदोलनस्थळी येऊन आताचे आंदोलन स्थगित करून पुढील आंदोलनाची दिशाही स्पष्ट केली. याला सर्व शेतकऱ्यांनी हात उंचावत होकार दर्शवला. यावेळी विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
यावेळी जालंदर पाटील, जनार्दन पाटील, स्वस्तिक पाटील, सावकर मादनाईक, सागर शंभूशेटे, वैभव कांबळे, राजेंद्र गड्ड्यानवर, अजित पवार, विक्रांत पाटील, राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
म्हणून घेतला निर्णय
दहा तास वीज देण्यासाठी समितीचा अहवाल येण्यास १५ दिवस लागणार आहेत. एवढे थांबलो, आता आणखी १५ दिवस थांबलो तर काही बिघडणार नाही; पण आततायीपणा करून आजच दिवसा वीज द्या म्हटले आणि मोठा तांत्रिक बिघाड झाला, महाराष्ट्र अंधारात गेला तर त्याचे खापर शेतकऱ्यावर फोडले जाईल, ते मला नको होते, म्हणून दोन पाऊले मागे येण्याचा निर्णय घेतल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
५ एप्रिलला कोल्हापुरात कार्यकारिणीची बैठक
स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणीची बैठक ५ एप्रिलला कोल्हापुरात होणार आहे. यावेळी शेतकऱ्यांशी संबंधित आंदोलने तीव्र करण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्याचे ठरणार आहे. त्याची तयारी म्हणून आजपासून राज्यभर स्वत: शेट्टी दौरे सुरू करणार आहेत.
असा आहे प्लॅन बी
दिवसा विजेसह वीज बिल दुरुस्तीसाठी आंदोलन चालू ठेवणे
राज्यभर दौरे करून लाेकांमध्ये जनजागृती करणे
१५ दिवसात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणे
५० हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदानासाठी लढा उभारणे
शेतकरी हा उपेक्षित घटक ठेवल्याबद्दल मानहानी याचिका दाखल करणे
दोन टप्प्यातील एफआरपीची याचिका दाखल
दोन टप्प्यात एफआरपी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. संघटनेतर्फे योगेश पांदे हे काम पाहणार आहेत. एप्रिलमध्ये ही याचिका सुनावणीसाठी पटलावर घेणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.