कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतीमधील कर्मचारी १ सप्टेंबर २०२१ पासून बेमुदत कामबंद आंदोलन करतील. आंदोलनाची हाक इचलकरंजी नगर परिषद कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटनेने दिली आहे, अशी माहिती नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटना कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विजय पाटील, समन्वयक अण्णासाहेब कागले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, दरमहा देण्यात येणाऱ्या सहायक अनुदानात कपात केल्याने नगर परिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन वेळेवर होत नाही. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीपूर्व व सेवानिवृत्तीनंतर देय असणारे लाभ सध्या मिळत नाहीत. राज्य शासनाकडील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळावी, सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळावी, नगर परिषदेकडील सफाई कर्मचाऱ्यांना मालकीहक्काची घरे बांधून द्यावीत, आदी मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला आहे.
पत्रकार परिषदेस के. के. कांबळे, धनंजय पळसुले, प्राचार्य ए. बी. पाटील आदी उपस्थित होते.