शहरातील सुमारे दोन हजाराहून अधिक कुटुंबांचे अतिक्रमण नियमितीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. शहरातील राजकीय नेत्यांनी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिक्रमण कायम करण्याचे आश्वासन देऊन अतिक्रमणधारकांचे अर्जही भरुन घेतले होते. मात्र सहा महिने उलटले तरी त्यावर निर्णय न झाल्याने शहर अतिक्रमणधारक कृती समितीच्यावतीने सोमवारी पालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन केले होते व चार दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास १५ ऑगस्टला भूमी अभिलेख आणि प्रांत कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
मात्र, अतिक्रमण नियमितीकरणाची प्राथमिक जबाबदारी पालिका प्रशासनाची असून, जबाबदारी पार पाडून आंदोलकांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचे पत्र प्रांत कार्यालयाने दिल्याने पालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे लक्ष आहे.
कोट : पालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अतिक्रमण नियमितीकरणाचा प्रश्न रखडला आहे. पालिका प्रशासन आणि पालिका सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न सोडविण्याची इच्छा नाही. आमच्यावर कोणतीही कारवाई झाली तरी चालेल आमचे ठरलेले आंदोलन होणारच.
- राजू आवळे, कृती समिती प्रमुख