कोल्हापूर : देशात ७0 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करीत असताना इतक्या वर्षांत वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबांत आजही विजेचे दिवे नाहीत, हे वास्तव आहे. मात्र, गगनबावड्यातील ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे विचार मंच’ने या परिसरातील वंचित घरांमध्ये विजेचे दिवे बसवून अंधार कायमचा दूर केला. स्वातंत्र्यदिनी विधायक उपक्रम राबविण्याकडे युवा पिढीसह संस्था-संघटनांचा कल असतो. वर्षानुवर्षे अंधारात जगत असलेल्या कुटुंबांत प्रकाश उजळविण्याचे काम ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे विचार मंच’ने केले. ग्रामविकास आणि जलसंपदा विभागाचे अव्वर सचिव मैनुद्दीन तासीलदार, डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी पांडुरंग कांबळे, दाऊद थोडगे, आवराबाई झुरे, अब्दुल नाकाडे, कांचन शिंदे यांच्या घरी मीटरसह विजेचे दिवे बसविण्यात आले आणि स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी या कुटुंबीयांचे घर प्रकाशाने उजळून निघाले. यावेळी कार्यक्रमाचे संकल्पक माजी सभापती बंकट थोडगे, शाहीर आझाद नायकवडी, अमर कांबळे, रंगराव कांबळे, यासीन महात, कुसीम नाकाडे, दिलदार कांबळे, राजू जाधव, यासीन शेख, जमीर मुकादम, मनोज सूर्यवंशी, पांडू कोलके, किशोर कांबळे, सतीश पानारी, बहादूर मकानदार, मुबारक उस्ताद, सिराज मुकादम, आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनी वंचितांची घरे उजळली
By admin | Published: August 17, 2016 11:49 PM