कोल्हापूर : प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन म्हटले की राष्ट्रध्वज अर्थात सर्वांच्या डोळ्यांसमोर उभारतो तो डौलाने फडकणारा तिरंगा. हा तिरंगा खरेदीसाठी जिल्ह्यातील एकमेव ठिकाण असणाऱ्या बिंदू चौकातील खादी ग्रामोद्योग संघाच्या दुकानामध्ये गर्दी होऊ लागली आहे. यात खिशाला लावण्यापासून ते अगदी किल्ल्यांवरही फडकविला जाणारा तिरंगा येथे उपलब्ध आहे.एरव्ही जीवनामध्ये प्रत्येकजण विविध रंगांच्या ध्वजाखाली एकत्र येत असतील; पण जेव्हा देशाचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी हा एकमेव तिरंगाच आपली एकी काय आहे, हे दाखवून देतो. आपण सर्वजण या तिरंग्यापुढेच नतमस्तकही होतो. असा हा राष्ट्रध्वज अगदी एक बाय दीड, दीड बाय सव्वादोन, दोन बाय तीन, तीन बाय साडेचार, चार बाय सहा आणि कार्यालय, किल्ल्यांवर ध्वजारोहणासाठी लागणारे सहा बाय नऊ, आठ बाय १२ , १४ बाय २१ असे मोठे ध्वजही विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.एखादा भारतीय खेळाडू जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन मैदान गाजवितो आणि अंगावर तिरंगा लपेटून जेव्हा मैदानात फेरी मारतो, तो क्षण अजरामर ठरतो; तर देशाचे रक्षण करणारा जवान धारातीर्थी पडल्यानंतर ‘शहीद’ म्हणून त्याचे पार्थिव तिरंग्यामध्ये लपेटून ते अंतिम दर्शनासाठी ठेवतात.
हा अलौकिक मान नशीबवान लोकांच्याच पदरी पडतो. असा हा तिरंगा पॉकेट ध्वज, टीव्ही शोकेस ध्वज, टेबल ध्वज, क्रॉस कार ध्वज, टेबल ध्वज स्टँड, टेबल स्टँड, कार ध्वज अशा विविध १५ प्रकारांत खादीमध्येच उपलब्ध आहे. किंमतही अगदी पाच रुपयांपासून ते अगदी १९ हजार ६०० रुपयांपर्यंत आहे.
स्वातंत्र्यलढ्यात खादीपासून रोजगार उपलब्ध व्हावा,तसेच महात्मा गांधीजींनी खादीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने चरख्यावर खादीचे कापड निर्माण केले. विशेष म्हणजे आजही १०० रुपयांची खादी खरेदी केली तर त्यांतील ३० रुपये कारागिरांना मजुरी मिळते; तर खादी आरोग्यदायी ‘पर्यावरण मित्र’ आहे. यासह आपला देश उष्ण कटिबंधातील आहे. त्यात शरीरालाही खादी योग्य आहे. त्या काळापासून आजही भारतीय तिरंगा खादीच्याच कापडांमध्ये खादी ग्रामोद्योग संघाद्वारे उपलब्ध केला जातो.- सुंदरराव देसाई, अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघ