दत्ता पाटील
म्हाकवे : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतही महाआघाडीचा पॅटर्न राबविल्यामुळे पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) येथील ६३ वर्षांपासून असणारे राजे गटाचे प्राबल्य कमी होऊन सत्तांतर झाले. मंडलिक, मुश्रीफ व संजय घाटगे यांच्या आघाडीला येथे पहिल्यांदाच यश आले. या आघाडीला ९ पैकी ६ तर विरोधी राजे गटाला ३ जागा मिळाल्या. पहिल्यांदाच सत्तांतर झाल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
१९५७ पासून येथे राजे विक्रमसिंह घाटगे गटाची सत्ता अबाधित आहे. शाहूचे संचालक मारुती पाटील तसेच, माजी सरपंच प्रदीप पाटील, सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील सत्ता टिकून होती. मात्र, आघाडीच्या पॅटर्नमुळे सर्व गटांनी एकत्र येऊन सत्तापालटासाठी जोरदार प्रयत्न केले.
निधीचा बॅकलाॅग भरून काढणार
या गावच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. यापूर्वीचा सर्व बॅकलाॅग भरून पुढील २५ वर्षे कमतरता भासणार नाही इतका निधी देण्याचे अभिवचन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.