कोल्हापूर : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असो की हैदराबाद विश्वविद्यालय असो; या शिक्षणसंस्थांवर भाजपला आपला कब्जा निर्माण करावयाचा आहे. त्यांना विद्यापीठांतून पुराण शिकवायचे आहे; कारण भारताला हिंदुराष्ट्र करण्याचा त्यांचा डाव आहे. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांचे विचारच हा डाव उधळवून लावतील, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी शनिवारी येथे केले. ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिजागर सभेत ते बोलत होते. येथील ऐतिहासिक दसरा चौकात ही सभा झाली. तिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डाव्या चळवळीतील लोक व विशेषत: तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. व्यासपीठावर कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव अमरजित कौर, श्रीमती उमा पानसरे, मेघा पानसरे, मुक्ता दाभोलकर, उदय नारकर, अतुल दिघे, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, धनाजी गुरव, व्यंकप्पा भोसले, प्रा. विलास रणसुभे, आदी मान्यवर उपस्थित होते. अमरजित कौर म्हणाल्या, ‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची लढाई ही विचारांची होती. या देशात प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी जी लढाई केली त्याचसाठी या तिघांना बलिदान द्यावे लागले; परंतु ज्यांना विचार नकोत, चर्चा नको, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको व हम करे सो कायदा अशी ज्यांची मनोवृत्ती आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाला हिंदुराष्ट्र बनवायचे आहे. संघांचे संस्थापक हेडगेवार गुुरुजी यांचा हिटलर हा प्रेरणास्रोत होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंहांसारखे जे जवान फाशीवर गेले त्यांची संभावना संघाने ‘भटके हुए जवान’ अशी केली होती. अशा विचारांच्या नागपूर प्रशिक्षण केंद्रातून तयार झालेले नेतेच आज देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनले आहेत. समाजात भीती पसरवायची, जो आपल्या विचारास विरोध करील त्याचे इतके चारित्र्यहनन करायचे की त्याचा खून करायलाच लोक तयार होतील, अशी या विचारसरणीची कार्यपद्धती आहे. पानसरे यांच्यासह तिघा विचारवंतांचे बळी हे त्याच विचारसरणीने केलेले खून आहेत.’ प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, ‘पानसरे-दाभोलकर यांच्यासारखी माणसे पुन:पुन्हा जन्माला येत नाहीत. अशी माणसे घडायला युग जावे लागते. महाराष्ट्र पुरोगामी आहे हा आपला गैरसमज असून तो खऱ्या अर्थाने पुरोगामी व्हावा यासाठी सर्वशक्तीनिशी बळ बांधणे हीच या विचारवंतांना खरी श्रद्धांजली ठरेल. राज्यकर्ते भेकड असल्यानेच प्रतिगामी शक्तींनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्या बेभान झाल्या असून उन्माद माजवू लागल्या आहेत. अशा शक्तींना विचारांनीच सडेतोड उत्तर द्यावे लागेल.’ यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, दिलीप पोवार, संभाजीराव जगदाळे, प्रशांत वाघमारे, शिवाजीराव परुळेकर, गौतम कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता...?’ या पुस्तकाच्या ५१ व्या आवृत्तीचे तसेच ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या ‘गोविंद पानसरे नावाचे विद्यापीठ’ आदींसह एकूण चार पुस्तकांचे व विशेषांकाचे प्रकाशन झाले. स्वागत व प्रास्ताविक उदय नारकर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. सी. एम. गायकवाड यांनी केले.
भारत हिंदुराष्ट्र करण्याचा डाव
By admin | Published: February 21, 2016 1:09 AM