बाजीराव जठार
वाघापूर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे बाळूमामा देवालयात जागरानिमित्त पहाटे झालेल्या भाकणूककार कृष्णात डोणे- वाघापूरकर यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, शेतीविषयक परिस्थितीवर भाष्य केलं.
अशी झाली भाकणूक...
जगातील राष्ट्रे लढाई करतील, तिसरं महायुद्ध होईल,युद्धाचा भडका उडेल, भारत पाकिस्तान यांचं छुपं युद्ध होईल,चीन राष्ट्र भारतावर आक्रमक करील, भारतीय सैनिक त्यांना परतून लावतील. तिरंगा झेंडा आनंदात राहील.
कोरोना पेक्षा मोठी महामारी येईल,दीड महिन्याचे धान्य उदंड पिकंल, तांबडी रास मध्यम पिकंल. ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, ऊसाचा काऊस होईल, साखरेचा भाव तेजीत राहील, ऊसाच्या कांड्याने व दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ उडेल,मायेचं लेकरु मायेला ओळखायचं नाही.
चालता बोलता मनुष्याला मरण येईल,माझं माझं म्हणू नका,माणसाला माणूस खाऊन टाकील,येतील येतील लाकडाची डोरली येतील,तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल,येईल येईल राज्य गुंडांचे येईल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, ऊन्हाळ्याचा पावसाळा होईल, अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल, नदीकाठावरील जमीन ओसाड पडल. कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठं भगदाड पडेल, गर्वाने वागू नका.
गर्वाचे घर खालीच होईल, होईल होईल भुकूंप होईल, जंगलातील प्राणी गावात येईल, गावातील माणूस जंगलात जाईल,बारा बाजार मोडून एक बाजार होईल,समुद्रातील संपत्तीचा नाश होईल, आदमापूर हे गाव प्रतिपंढरपूर होईल, बाळूमामांची करशिला सेवा तर खाशीला मेवा, बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन. यावेळी भाकणुकीस बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, भाविक, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.