कोल्हापूर : कोल्हापूर ही कलानगरी... राजर्षी शाहू महाराजांच्या राजाश्रयाने येथे चित्र, शिल्प, संगीत अशा कला रुजल्या आणि बहरल्याही. ती कलापरंपरा आजही अव्याहतपणे सुरू आहे. पोलीस उद्यानात सुरू असलेला ‘कलाब्धी आर्ट फेस्टिव्हल’ या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. या निमित्ताने महोत्सवाचे समन्वयक म्हणून काम पाहत असलेले प्राचार्य अजेय दळवी यांची घेतलेली ही चर्चेतील मुलाखत...
प्रश्न : कलाब्धी आर्ट फेस्टिव्हलबद्दल काय सांगाल?उत्तर : सहा उच्चविद्याविभूषित मुली एकत्र येतात आणि कोल्हापुरात राष्ट्रीय कला महोत्सव व्हावा, असा संकल्प करून कामाला लागतात. पहिल्या वर्षीचा महोत्सव यशस्वी करतात आणि मिळालेल्या अनुभवाची शिदोरी घेऊन दुसऱ्या वर्षीही तितक्याच आत्मीयतेने त्या या महोत्सवाची तयारी करतात, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. अमृता जनवाडकर, डॉ. प्रियदर्शनी जैन, मानवी कामत, आर्किटेक्ट रिमा करंजगार, ग्रीष्मा गांधी, देविणा घाटगे या सहा मैत्रिणींनी एकत्र येऊन मोठ्या जबाबदारीने या उपक्रमासाठी मेहनत घेतली आहे. आज त्यांच्या प्रयत्नांना खºया अर्थाने यश आले आहे असे म्हणता येईल. भारतीय अभिजात कला हा ‘कलाब्धी’चा पाया आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने देशभरातील कलाकारांच्या कलाकृती पाहण्याची, अनुभवण्याची संधी
कोल्हापूरकर रसिकांना मिळत आहे.प्रश्न : भारतीय चित्र-शिल्पशैलीची वैशिष्ट्ये कोणती ?उत्तर : भारतीय संस्कृती कलेवर आधारलेली आहे. ही कला येथील मातीने परंपरेतून दिली, रुजवली आणि काळानुरूप बहरली. मुळातच भारतीय म्हणून आपले भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच समाजरचनेच्या दृष्टीने अनेक संपन्न अशी वैशिष्ट्ये आहेत. मग आपली शहरे, घरे, पेहराव, आहार, चालीरीती, भाषा असो किंवा पारंपरिक चित्र, शिल्प व वास्तुकला या युरोपापेक्षा खूप वेगळ्या होत्या व आजही पाश्चिमात्य प्रभाव पचवून त्या भारतीय म्हणून आपली सौंदर्यसंपन्नता टिकवून आहेत. भारतीय कलाचे स्वत:चे एक विश्व आहे. कारण एकूणच भारतीयत्व, पर्यावरण जतन आणि संवर्धन करीत असताना हीएक सकस समाजनिर्मितीचीच प्रक्रिया आहे.
पर्यावरणाचा संदेशया महोत्सवात देशभरातील चित्र, शिल्पसह अन्य कलाप्रकारांतील कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांच्या कलाकृती त्या त्या भागातील जीवनशैलीचे त्यांच्या कलेची प्रतिभा सांगत आहेत. पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर पर्यावरणाचा संदेश देणारा हा महोत्सव रसिकांसाठी विशेष उपलब्धी ठरेल.
- भारतीय अभिजात कलेला काळाला अनुसरून अधिक संपन्न करण्याची अभिलाषा ‘कलाब्धी’ या कलामहोत्सवाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न होतो आहे, ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. अभिजात चित्र-शिल्पकलेच्या माध्यमातून मोलाचे काम निश्चित होऊ शकते आणि याच विश्वासाने यंदाचाही हा राष्ट्रीय कलामहोत्सव होत आहे. पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय परंपरेतील पर्यावरणपूरक सत्य, ऊर्जा, अपरिग्रह, सौंदर्य या मूल्यांचीही त्यांनी विशेष दखल ठेवली आहे.