कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डातर्फे कोल्हापुरात २० ते २२ जानेवारी २०२३ अखेर इंडियन डेअरी फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. फेस्टिव्हलमधील दूध परिषद सयाजी हॉटेलमध्ये, तर शाहूपुरीतील जिमखाना मैदानात डेअरी एक्स्पो होईल. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील सहकारी आणि खासगी दूध संघ, देशातील डेअरी उद्योगातील सर्व सहयोगी घटक सहभागी होतील, अशी माहिती ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.नरके म्हणाले, दूध परिषदेत देशातील दुग्ध व्यवसायासमोरील संधी, आव्हाने, दूध उत्पादनात वाढ आणि २०३० पर्यंतची ध्येयधोरणे ठरविण्यासाठी तज्ज्ञ सहभागी होतील. शाहूपुरी जिमखाना मैदानात दूध उत्पादक शेतकऱ्यांपासून, दूध संस्था, दूध प्रक्रिया संघ आणि ग्राहक या सर्व घटकांना लागणारी आवश्यक माहिती, तंत्रज्ञान एकाच छताखाली मिळवून देण्यात येणार आहे.
‘नांदी नव्या धवल क्रांतीची’ हे घोषवाक्य घेऊन आणि सद्य:स्थितीतील पशुधन, डेअरी क्षेत्रातील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या बळावर अधिक आणि गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, संकलन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासह विविध विषयांवर यामध्ये चर्चा होईल. दूध उत्पादक, सर्व दूध संस्था आणि डेअरी उद्योगातील सर्व घटक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतील.
यावेळी ‘गोकुळ’चे माजी चेअरमन अरुण नरके, चितळे उद्योग समूहाचे संचालक आणि चितळे डेअरीचे भागीदार गिरीश चितळे, वारणा दूध संघाचे विक्री व्यवस्थापक अनिल हेरलेकर, भारती डेअरीचे अध्यक्ष किरीट मेहता, थोरात डेअरीचे अध्यक्ष आबासाहेब थोरात, विराज डेअरीचे अध्यक्ष विशाल पाटील, गोविंद डेअरीचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, कुटवळ डेअरीचे अध्यक्ष प्रकाश कुटवळ, थोपटे डेअरीचे अध्यक्ष नितीन थोपटे, समाधान डेअरीचे अध्यक्ष राहुल थोरात, विमल डेअरीचे अध्यक्ष सुभाष मयेकर, दत्त इंडिया डेअरीचे अध्यक्ष सबर्जीत आहुजा, मयूरेश टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी संजीव गोखले, आदी उपस्थित होते.
अमूलपेक्षा जास्त दर देऊराज्यात अमूल दूध संकलन करीत आहे. जादा दराचे आमिष दाखवत आहे. त्यापेक्षा अधिक दूध दर आम्हीही देऊ, आपल्यातील स्पर्धा बाजूला ठेवून परराज्य, परदेशातून येणाऱ्या दुधाशी स्पर्धा करू, असे आश्वासन कुटवळ डेअरीचे अध्यक्ष प्रकाश कुटवळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. राज्यात सहकारी, खासगी दूध संघ अनेक आहेत. या प्रत्येकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे या टप्प्यावर सिंगल ब्रँड करणे आणि दुधाला आधारभूत किंमत निश्चित करणेही शक्य नाही. पण, येणाऱ्या काळात प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेवरील खर्च करून उत्पादकांना जादा पैसे आणि ग्राहकांना परवडेल अशा किमतीत दूध विकण्यासाठी प्रयत्न होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.