तोंडोली : भारती कला अकादमी प्रस्तुत कला महोत्सवामध्ये कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने यावर्षीचा ‘भारतीयम् करंडक’ पटकावला. कोल्हापूरच्याच भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने उपविजेतेपद, तर सर्वसाधारण विजेतेपद रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने मिळवले.२९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधित कडेगाव येथील भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात घेण्यात आलेल्या भारतीयम् करंडक २०१५ चे पारितोषिक वितरण सुप्रसिध्द अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारती विद्यापीठ शालेय समिती अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. हणमंतराव कदम व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुलक्षणा कुलकर्णी उपस्थित होत्या.यावेळी बोलताना अभिनेत्री भार्गवी चिरमुले म्हणाल्या की, प्रत्येक कलाकाराने स्वत:मधील कलाकार जिवंत ठेवताना आपल्यातील माणूसही जपला पाहिजे. मेहनत, सातत्य व चिकाटी या गोष्टीतूनच माणूस मोठा होत असतो. विजयमाला कदम म्हणाल्या की, भविष्यात भारतीयम् हे व्यासपीठ देशभरातील कलाकारांसाठी एक अग्रगण्य व्यासपीठ ठरेल. येथील कलाकार आपल्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर कलावंत म्हणून मोठा लौकिक मिळवतील.निकाल असा (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय) : सुगम गायन : गीता कुलकर्णी (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर), नेहा प्रभुघाटे (राजेंद्र माने महाविद्यालय, देवरूख), तर गौरव बडवे (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी). समूह गायन : विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर, भा. वि. अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी. मूकनाट्य : भा. वि. अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर, भा. वि. आय. एम. आर. डी. ए. महाविद्यालय, सांगली, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर. लघुनाट्य : राजेंद्र माने महाविद्यालय, देवरूख, भा. वि. न्यू लॉ कॉलेज, सांगली, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी. समूहनृत्य : मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्यामहाविद्यालय, कडेगाव, भा. वि. कॉलेज आॅफ फार्मसी, कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेज, वारणानगर. पारितोषिक वितरणप्रसंगी भारती कला अकादमीचे प्रा. शारंगधर साठे, प्रा. दत्ता ढोणे, जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पं. स. सभापती रेखाताई महाडिक, उपसभापती विठ्ठल मुळीक, माजी सभापती आसमा तांबोळी, शोभा होनमाने, कॉँग्रेस तालुकाध्यक्षा मालन मोहिते, पं. स. सदस्य सखाराम सूर्यवंशी, उपप्राचार्य अनिल शिंदे, प्रा. मधुकर खोत उपस्थित होते.प्राचार्या डॉ. सुलक्षणा कुलकर्णी यांनी स्वागत केले. प्रा. सूर्यकांत बुरूंग व प्रा. रंजना चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कला अकादमीचे प्रा. राजेंद्र उत्तुरकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)‘भारतीयम्’ कलाकारांचे व्यासपीठयावेळी बोलताना भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम म्हणाल्या की, गेल्या आठ वर्षांपासून भारतीयम् करंडक कला महोत्सव सुरू आहे. अल्पावधित स्पर्धेची वाढलेली व्याप्ती पाहता ही स्पर्धा देशपातळीवरही लौकिक प्राप्त करेल. या स्पर्धेत सहभागी होणारे कलाकार आपले कष्ट व मेहनतीच्या जोरावर भविष्यात मोठा लौकिक प्राप्त करतील, यामध्ये कोणतीही शंका नाही. जे काही सादरीकरण करायचे, ते पूर्ण लक्ष देऊन करा. भविष्यात यश तुमचेच आहे.
भारतीयम् करंडक ‘विवेकानंद’कडे
By admin | Published: February 02, 2015 11:10 PM