चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : प्रतिकूल हवामानामुळे येत्या हंगामात भारतातील साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असतानाच आता जागतिक परिस्थितीही फारशी आशादायक नसल्याचे समोर आले आहे. २०२३-२४ च्या हंगामात जगातील साखरेचे उत्पादन १.२३ टक्क्याने घटून १७४० लाख ८४ हजार टन इतके होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने (आयएसओ) वर्तविला आहे. चालू हंगामात ते १७७० लाख टन झाले. याचाच अर्थ आगामी हंगामात सुमारे २१ लाख ८० हजार टनांनी साखर उत्पादन घटणार आहे.ब्राझीलमध्ये यंदा हवामान अनुकूल असल्याने ४०० लाख टनाहून अधिक विक्रमी साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रूड तेलाचे भाव चढे असल्याने ब्राझील मोठ्या प्रमाणात साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याची शक्यता आहे.
भारतातील उत्पादन घटणारभारतात विशेषत: महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाऊस कमी असल्याने ऊस उत्पादनाला मोठा फटका बसून भारतातील साखर उत्पादनही येत्या हंगामात घटणार आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा)च्या अंदाजानुसार ते ३२९ लाख टनवरून ३१७ लाख टनपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. यामध्ये इथेनॉलकडे वळविले जाणारी साखर धरलेली नाही. केंद्र सरकारने मात्र इस्माचा हा अंदाज फेटाळून लावताना देशात साखर कमी नाही आणि आगामी हंगामाचा अंदाज हा आताच वर्तविणे योग्य नाही, असे म्हटले होते.
मात्र, साखर उद्योगातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामात ३०५ ते ३१० लाख टनच्या आसपासच उत्पादन होण्याची शक्यता आहे. याचाही परिणाम साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी - पुरवठ्यावर होणार आहे.
१२ वर्षांतील उच्चांकी भावआयसीईच्या वायदेबाजारात कच्ची साखर (रॉ शुगर) सध्या ४५ हजार ९५० रुपये टन दराने विकली जात आहे. न्यू यॉर्कच्या वायदेबाजारात हाच दर ५० हजार ४२५ रुपये टन आहे. गेल्या बारा वर्षांतील हा उच्चांकी दर असल्याचे सांगितले जाते.
आयएसओच्या अंदाजानुसार असे असेल साखरेचे जागतिक चित्र (आकडे दशलक्ष टनांत)
२०२२-२३ | २०२३-२४ | |
उत्पादन | १७७०२४ | १७४८३९ |
उपभोग (गरज) | १७६५३१ | १७६९५७ |
अतिरिक्त/ तूट | ४९३ | २११८ |
आयात मागणी | ६५३८० | ६४३७३ |
निर्यात उपलब्धता | ६५५१९ | ६१५५९ |